सातारा ः यंग इन्स्पीरेशन चॅरिटेबल सोसायटी मार्फत 28 जानेवारी 2018 रोजी सातारा हिल सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे हे पहिले वर्ष असूनही स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आहे.स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा मार्गावर स्पर्धकांचे स्वागत करून त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
कट्टा ग्रुप या नावाने सुरू झालेल्या छोट्याशा रोपट्याने सांस्कृतिक कार्यक्रम, बॉडी बिल्डींग, डान्स स्पर्धा अशा स्पर्धांच्या यशस्वी आयोजना नंतर राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा व कॉमेडीची बुलेट ट्रेन या मोठया कार्यक्रमाला यंग इन्स्पीरेशन चॅरिटेबल सोसायटी असे मूर्त स्वरूप देवून सातारकरांच्या सहकार्याने पुढील वाटचाल करत आहे.
या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात प्रथम आपल्या सातारा मध्ये सायकलिंग रूजावे व पर्यायाने हरित सातारा या उपक्रमाला पाठिंबा मिळावा या उद्देशाने सातारा हिल सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
28 जानेवारी रोजी सकाळी ठिक 6.30 वाजता स्पर्धेचा शुभारंभ पोलिस परेड ग्राऊंड येथुन होणार असून पोवईनाका-समर्थमंदिर मार्गे बोगदा येथून कास रोड-एकिव फाटा-दुंद ग्रामपंचायत-वेळे मार्गे-मेढा रोड-कोंडवे-मोळाचा ओढा व पुन्हा पोलिस परेड ग्राऊंड असा 55 किमी अंतराची मुख्य स्पर्धा असणार आहे. तसेच 15 किमी अंतराची फन सिटी राईड ही देखील पोलस परेड ग्राऊंड-पोवई नाका-समर्थ मंदिर मार्गे-बोगदा-कुरणेश्वर मार्गे-सोनगांव फाटा-एसपीएस कॉलेज-हायवे सर्वीस रोड मागे-हॉटेल मराठा पॅलेस-गोडोली तळे-सायन्स कॉलेज-पोवई नाका मार्गे परत पोलीस परेड ग्राऊंड अशी राहणार आहे.
स्पर्धेचा शुभारंभ सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले, आमदार श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे. दि. 26 जानेवारी 2018 रोजी स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी सायंकाळी सातारा शहरातून सायकल रॅली काढण्यात येणार आहे. 27 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, बीब असे स्पर्धेचे किट वाटप करण्यात येणार असून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पोलिस परेड ग्राऊंडवर करण्यात आले आहे. सदर सर्व कार्यक्रमांना सातारकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.