Tuesday, December 2, 2025
Homeठळक घडामोडीबोगदा ते कास रस्त्याच्या रुंदीकरणास लवकरच प्रारंभ ; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश;...

बोगदा ते कास रस्त्याच्या रुंदीकरणास लवकरच प्रारंभ ; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश; रस्त्यासाठी 80 कोटी निधी मंजूर 

साताराः जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठार या पर्यटनस्थळाकडे जाणारा मार्ग काही दिवसांपूर्वी घाटात खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आता बोगदा ते कास असा 20 किलोमीटरचा रस्ता 9 मीटरने रुंद होणार असल्याने वाहतूक अगदी सुरळीत आणि सुरक्षित होणार आहे. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून बोगदा ते कास या रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण आणि 10 वर्ष देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तब्बल 80 कोटीचा निधी मंजूर झाला असून पर्यटन वाढीसह दळणवळणचा प्रश्‍न कायमचा सुटणार आहे.
निसर्गरम्य कास तलाव, आल्हाददायक वातावरण आणि रंगीबेरंगी फुलांमुळे कास पठाराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जागतिक पर्यटनस्थळ असल्याने कासला दरवर्षी हजारो पर्यटक गर्दी करत असतात. बोगदा, यवतेश्‍वर घाट ते कास हा रस्ता लहान असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहतूकीची कोंडी होत असते. त्यातच अवघड आणि तिव्र वळणे, दरड कोसळणे, घाटात रस्ता खचणे आदी घटनांमुळे हा रस्ता नेहमीच धोकादायक समजला जातो. या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नेहमीच पाठपुरावा केला आहे. यवतेश्‍वर घाटात अनेक ठिकाणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेवरुन रस्ता रुंदीकरणही करण्यात आले आहे. मात्र बोगदा ते कास या संपुर्ण रस्त्याचे रुंदीकरण झाले तर, या मार्गावरील वाहतूक कायमस्वरुपी सुरक्षित होईल या उद्देशाने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्याकडे सातारा- बोगदा ते कास या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. आ. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानेच बोगदा ते कास रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध झाला असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सदर कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून 20 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर 7 मीटरचे डांबीरकरण आणि दोन्ही बाजूला प्रत्येकी 1 मीटर साईडपट्टी केली जाणार असल्याने रस्ता 9 मीटर रुंद होणार असून वाहतूकीसाठी पुर्णपणे सुरक्षित आणि मोठा होणार आहे. येत्या दोन- तीन महिन्यात रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असून संबंधीत ठेकेदाराने दोन वर्षात रस्त्याचे काम पुर्ण करावयाचे आहे. त्यानंतर 10 वर्ष या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही संबंधीत ठेकेदारावर राहणार आहे. येत्या काही महिन्यात काम सुरु होरणा असल्याने कास पठारावर होणार्‍या वाहतूक कोंडीची समस्या कायमची संपुष्टात येणार आहे.
पर्यटनवाढीच्या दृष्टीने कास रस्त्याचे रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे होते. येत्या दोनतीन महिन्यात रस्त्याच्या रुंदीकरणारस प्रारंभ होत आहे. त्यामुळे पर्यटनवाढीबरोबरच स्थानिकांना रोजगाराचीही चांगली संधी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा कास रस्ता रुंदीकरणाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला असून सातारकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्‍न सोडवता आला, याचे आपल्याला मनस्वी समाधान वाटत असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमीत्ताने स्पष्ट केले आहे. प्रशासकीय सोपस्कार पुर्ण करुन लवकरात लवकर रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होण्यासाठी प्रयत्न करा. काम दर्जेदार करा, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular