वडूज : मायणी, ता.खटाव येथील केबल व्यवसायिक मोहन बाबुराव जाधव (दाजी ) यांनी सोमवार दि. 26 रोजी सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येस मायणी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे हे कारणीभूत असल्याची चिठ्ठी जाधव यांच्या खिशात आढळून आली आहे. तसेच त्यांचा मुलगा राजाराम जाधव यानेही गुदगे यांच्या त्रासाला कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे.
या प्रकरणातील संशयीतास तातडीने अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी मायणी पोलीस दूरक्षेत्रावर मोर्चा काढून बराच वेळ ठिय्या मांडला. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी सुरेंद्र गुदगे याच्या विरोधात भादंवि कलम 306 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, मूळचे नेवरी ता. खानापूर येथील रहिवासी असलेले मोहन जाधव गेली अनेक वर्षे व्यवसायानिमित्त मायणीत स्थायिक झाले होते. ते गेली अनेक वर्षे केबलचा व्यवसाय करीत आहेत. व्यवसायाबरोबरच सामाजिक, राजकीय कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. सुमारे सहा वर्षापूर्वी ते भाजपाचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. तर पाच वर्षापूर्वी ते गुदगे गटात गेले होते. सहा महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ते परत मूळ येळगावकर गटात परतले होते. तसेच त्यांच्या मुळे एक दोन प्रभागांत गुदगे समर्थकांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सुरेंद्र गुदगे हे जाधव यांना गेली काही दिवस वारंवार त्रास देत आहेत. मायणी बँकेच्या कर्जापोटी दिलेल्या कोर्या धनादेशाचा गैरवापर करण्याबरोबर केबल व्यवसायावर तक्रार करून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली जात होती. या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी मयत जाधव यांच्या खिशात सापडली आहे.
दरम्यान मयत जाधव हे सकाळी एस टी बस स्थानक परिसरात गेले होते. ते घरी आल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. फिर्यादी मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यास पत्नी सारीका हिचा फोन आल्यानंतर तो तातडीने घरी गेला व त्यानंतर त्यांनी चारचाकी वाहनातून विटा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले मात्र त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी त्यांना सांगितले. त्यानंतर विटा ग्रामीण रूग्णालयात नेऊन त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
मायणीत पोलीस ठाण्यासमोर जमाव :
दरम्यान केबलवाल्या दाजींनी आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात पसरल्यानंतर सायंकाळी पाच वाजले नंतर शेकडो ग्रामस्थ चांंदणी चौक परिसरात जमले. विटा येथून प्रेत आल्यानंतर ग्रामस्थांनी प्रेतासह पोलीस दूरक्षेत्रावर मोर्चा काढला. संशयीत आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व त्यास तातडीने अटक करा या मागणीकरीता बराच वेळ पोलीस दूरक्षेत्रासमोर ठिय्या मांडला होता. त्यानंतर पोलीसांनी सुरेंद्र गुदगे याच्यावर कलम 306 प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर प्रेतयात्रा पोलीस ठाण्यातून जाधव यांच्या निवासस्थानी नेण्यात आली. रात्री उशिरा तणावपूर्ण व शोकाकूल वातावणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, म्हसवडचे सपोनी मालोजीराव देशमुख, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आदींनी भेट दिली.