सातारा : नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत 2018-19 सालचा 224 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. याला विरोधी पक्षांसह सत्ताधारी सदस्यांनी सूचना-उपसूचना मांडून चर्चा करत विरोध दर्शवल्याने बजेट एकमताने मंजूर न होता मतदानाद्वारे मंजूर करण्यात आले. आता बजेट जिल्हाधिकार्यांकडे मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी बजेट मांडल्यानंतर अर्थसंकल्पीय चर्चेत विरोधीपक्षनेते अशोक मोने, वसंत लेवे, सिद्धी पवार, शेखर मोरे, निशांत पाटील, राजू भोसले, डी. जी. बनकर, लिना गोरे आणि बहुतांश सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. नविआ व भाजपाकडून बजेटला उपसूचना मांडण्यात आली. तीन तासाच्या चर्चेनंतर 19 विरुद्ध 12 मतांनी बजेट मंजूर करत उपसूचना फेटाळण्यात आली.
शहरातील रस्ते, पाणी-वीजेसह आरोग्य, उद्याने, मैदाने आणि विकासकामांवर 2018-19 च्या 224 कोटींच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. विनाकरवाढ अर्थसंकल्प शहराच्या विकासाची नवी दिशा देणारे असल्याचे उपाध्यक्ष राजेशिर्के यांनी मनोगतात सांगितले. यावर नविआचे अशोक मोने आणि भाजपाच्या सिद्धी पवार यांनी कडाडून हल्ला करत उपसूचना मांडून अर्थसंकल्प नामंजूर करण्याची मागणी केली. पालिकेने कामांसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढत असताना ती कामे अदयाप सुरु नाहीत. बागांवर थोडा-थोडा खर्च टाकूनही वर्षानुवर्षे कामे पूर्ण नसल्याने एकदाच खर्च करून बागा नागरिकांना खुल्या करा. मिळकतींचे फेरमूल्यांकन केलेले नाही. परिणामी तुटपुंज्या भाडेदरावर शेकडो मिळकती सोम्या-गोम्यांच्या घशात अडकल्या आहेत. आकडे फुगवून विकासाचा बागलबुवा केला जात असला तरी लोकांच्या करातून खर्ची होणार्या निधीचा वारेमाप अपव्यय सुरु असल्याची घणाघाती टीका विरोधकांनी केली. पोहण्याच्या तलावासाठी 25 लाखांची तरतूद केली असून तात्काळ कामे करून तो यंदा बालगोपाळांसाठी खुला करा. अन्यथा नुसती तरतूद करून तो निधी पळवायचा, असे चालणार नसल्याचे मोनेंनी सांगितले.
पालिकेच्या वाहनाला भाडे न लावता ठेकेदाराच्या मागे फिरणार्या अधिकार्याचे निलंबन करण्याची मागणी सत्ताधारी माजी आरोग्य सभापती अण्णा लेवे यांनी केली. आरोग्यचे भाग निरीक्षक कायगुडे उपस्थित नसल्याने या प्रकारची गंभीर दाखल घेत अध्यक्षांनी कारवाईचे आदेश मुख्याधिकार्यांना दिले. सभागृहाची अवस्था बिकट असून मागील वर्षीचा 20 लाखांचा निधी गेला कुठे, हा प्रश्न उपस्थित करताना प्रशासनाची झाडाझडती अण्णांनी घेतली. मात्र, कार्यालीन खर्चातून सभागृहाचे काम दर्जेदार करण्याचे आश्वासन दिल्यावर या वादावर पडदा पडला असला तरी यावेळी विरोधी सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तत्पूर्वी 2017-18 च्या बजेटमधील खर्ची निधी भांडवली अखर्चित राहिल्याने तो बचत झाल्याचे दिसत नसल्याने विरोधकांनी गदारोळ घातला. आकडे बदलताना किमान शासनाने दिलेल्या निर्देशांसह जिल्हाधिकार्यांनी बजेट मंजूर करताना दिलेल्या सूचना का उघड केल्या नाहीत. पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी विशेष काही होत नसल्याने विरोध करावा लागत असल्याचे बहुतांश सदस्यांनी सभागृहात मांडले. बहुमताच्या जोरावर जर रेटून मंजुरी घेत असाल तर ते चालून देणार नसल्याचे मोनेंनी स्पष्ट केले. अखेर तीन तासाच्या वादळी चर्चेनंतर मतदान घेत 2018-19 चा बहुचर्चित अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
वारंवार बोलता येणार नाही, एकदाच बोला असे मोनेंना बनकरांनी बोलल्यावर ही दादागिरी सभागृहात चालणार नाही. मी लोकांमधून निवडून आलो आहे, तुमच्यासारखा कोप्शनमधून सभागृहात बसलेलो नाही. बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करता येतील पण सदस्यांचा आवाज दाबता येणार नसल्याचा इशारा मोनेंनी दिला.
मोने-लेवेंचा सभागृहात झालेला वाद सातारकरांनी पाहिला होता. त्यामुळे आज दोघे एकमेकांची बाजू सावरताना सत्ताधार्यांवर तुटून पडल्याचे पाहून दोघे वेगवेगळ्या आघाड्यात असले तरी जय-विरूफ एकच आहेत, याचे प्रत्यंतर सभागृहाला आले. मात्र, लेवेंनी सूचनेच्या तर मोनेंनी उपसूचनेच्या बाजूने मतदान केले.

