सातारा : गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 376 जणांच्या नोकर भरतीची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने दिला. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून आमदार जयकुमार गोरे गटाने आनंद व्यक्त केला तर केवळ राजकीय आकसापोटी सरकारने ही चुकीची कारवाई केली, असा गंभीर आरोप बँकेच्या विद्यमान पदाधिकार्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी नेत्यांच्या ताब्यात असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या वर्षी मोठी नोकर भरती केली होती. याच बँकेत संचालक असलेले जयकुमार गोरे यांनी या नोकर भरतीच्या विरोधात उपोषणही केले होते. त्यानंतर बोराटवाडीतील त्यांच्या एका कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात या प्रक्रियेविरुद्ध धावही घेतली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने या प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला दिले होते.
त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने संपूर्ण चौकशी करून बुधवारी अप्पर मुख्य सचिवांच्या सहीने आदेश काढला आहे. सचोटी, पारदर्शकता, पावित्र्य अन् बँकेचे हित या सर्व बाबींचा विचार करून ही नोकरभरती रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे या आदेशात म्हटले आहे.
सरकारच्या या निर्णयाबाबत बँकेचे संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. मसत्ताधारी मंडळींच्या हिटलरशाहीतून झालेल्या भ्रष्टाचाराला या निर्णयामुळे सुरुंग लागला, अशी प्रतिक्रिया गोरे यांनी व्यक्त केली.दरम्यान जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या निर्णयावर कडाडून टीका केली. बँकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ राजकीय आकसापोटी भाजप सरकारने हा चुकीचा निर्णय घेतला. या विरोधात आम्ही जरूर कार्यवाही करू, अशी भूमिका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मांडली.
सातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा आदेश
RELATED ARTICLES