फलटण (प्रतिनिधी):- गिरवी तालुका फलटण गावच्या हद्दीत चाहुर मळा नजीक दुहेरी खुनाची घटना उघडकीस आली असून वडील व त्यांची दोन वर्षाची मुलगी यांचा खून झाला आहे.या खून प्रकरणी मयत यांच्या चुलत भावास संशयित म्हणुन अटक करण्यात आली असून संशयित आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला गंभीर अवस्थेत फलटण येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरूण मिळालेल्या माहितीनुसार, किरण उर्फ पंकज भुजंगराव कदम वय अंदाजे 32 हे त्याची मुलगी कार्तिकी किरण कदम वय 2 वर्ष हे सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असणाऱ्या शेतात जनावरांना मका आणण्यासाठी मोटरसायकलवरती गेले होते. बराच वेळ होऊनही किरण कदम व त्याची मुलगी हे घरी आले नाही म्हणून घरातील व्यक्तींनी व नातेवाईक यांनी बराच शोध घेतला असता मक्याच्या शेतात रक्त आढळून आले. पुढे शोध घेताना शेतातील कोरड्या विहरीत किरण कदम यांचा मृतदेह दिसला शेजारीच मुलीचा एका पोत्यात मृतदेह आढळून आला. मुलीच्या तोंडात तिच्या अंगावरील टि शर्ट कोंबून तिचा गळा दाबून मृतदेह पोत्यात आढळून आला. मयत किरण यांच्या मानेवर व अंगावर वार आढळून आले. यानंतर नातेवाईकानी फलटण ग्रामीण पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत चौकशी करीत असताना आकाश सदाशिव कदम, वय अंदाजे 19 यांच्या हलचाली संशयास्पद वाटल्या त्यांच्याकडे माहीती विचारली असता त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणुन त्यांस संशयित म्हणून ताब्यांत घेतले असता प्रथम त्याने पोलिसांना चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना आकाश कदम यांच्यावर दाट संशय आल्यानंतर पोलिसी हिसका दाखवल्यानंतर त्यांने एक कुऱ्हाड पोलिसांच्या स्वाधीन केली. यानंतर त्यास अटक करून घेऊन जात असताना संशयित आरोपीने विषारी कीटकनाशक प्राशन केले. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपीस फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर आरोपीची प्रकृती बिघडल्याने त्यास फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अभिजित पाटील, फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाचे काम सुरू होते. सदर घटनेचा रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
मयत किरण कदम यांच्या पश्चात एक मुलगा, आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. संशयित आरोपी आकाश कदम हा त्यांच्या घराशेजारी राहत होता. घरगुती कारणातून सदर दुहेरी हत्याकांड केल्याचे समजते. आकाश कदम हा आय टी आईचे लोणंद येथे शिक्षण घेत असून त्यांच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समजते.