पाटण:- ( शंकर मोहिते) – छ. उदयनराजे चोवीस बाय सात, समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्ट पाटण आणि डी. के. सामाजिक संस्था पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव कालावधीमध्ये पाटण तालुकास्तरीय सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ उत्कृष्ठ देखावा व घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते व तहसीलदार रामहरी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. २१ रोजी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ व दादासाहेब खांडके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
तालुकास्तरीय सार्वजनिक गणेश उत्सव उत्कृष्ठ देखावा स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे १० हजार रुपयांचे पारितोषिक नितीन पिसाळ व प्रल्हाद माने (नाना) यांचेकडून, द्वितीय क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे पारितोषिक महादेव कुंभार व तृतीय क्रमांकाचे २ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक संजय शेडगे यांच्याकडून देण्यात येणार आहे. गणेश मंडळ उत्कृष्ठ देखाव्यासाठी ५०० रुपये प्रवेश फी असून नाव नोंदणीसाठी यशवंतराव जगताप (9822390957) व संजय इंगवले (9922210091) यांच्याशी संपर्क साधावा.
उत्कृष्ठ घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपयांचे पारितोषिक यादव सर्जीकल हॉस्पीटल पाटण यांचेकडून, द्वितीय क्रमांकासाठी २ हजाराचे पारितोषिक सुशिला क्लिनिक व तृतीय क्रमांकासाठी १ हजाराचे पारितोषिक पाटण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दीपक शिंदे यांचेकडून देण्यात येणार आहे. गौरी गणपती सजावट स्पर्धेसाठी १०० रुपयांची प्रवेश फी ठेवण्यात आली असून नाव नोंदणीसाठी सौ. आयेशा सय्यद (9881984011) व सौ. विद्या म्हासुर्णेकर-नारकर (9130375209) यांच्याशी संपर्क साधावा.
दरम्यान, वरील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखात शनिवार दि. २१ रोजी रात्री ९ वाजता पाटण येथील श्रीमंत रणजितसिंह पाटणकर स्मारक मंदिरात होणार आहे. यानिमित्ताने पाटण व पाटण परिसरातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेले आपल्या कुटुंबासोबत पहावे अशा फु बाई फु व कॉमेडीची बुलेट ट्रेनचा बादशाह संतोष पवार याच्या सोनू तुला भरोसा नाही का? या एकमेव धमाल विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकाच्या तिकीटासाठी दादासाहेब खांडके (9822548282) यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभही आयोजित केला आहे.
वरील स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी व घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन पिसाळ व दादासाहेब खांडके यांनी केले आहे.

