Wednesday, November 5, 2025
Homeठळक घडामोडीराष्ट्रवादी व डॉ. येळगांवकर गटाला दिलासा; आ. गोरेंच्या वारुला लगाम

राष्ट्रवादी व डॉ. येळगांवकर गटाला दिलासा; आ. गोरेंच्या वारुला लगाम

वडूज (धनंजय क्षीरसागर) : वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार बहुमताने विजयी झाला. तर भाजपाच्या महिला नगरसेविकेस बिनविरोध उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. वरकर्णी या निवडणूका एकतर्फी पार पडल्याचे चित्र आहे. मात्र पडद्याआड मोठ्या प्रमाणावर शह, काटशहाचे राजकारण झाले. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर राजकीय मंथनही झाले. पक्षीय पातळीवर विचार करता या निवडणूकीमुळे वडूज शहर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर यांच्या गटाला चांगला दिलासा मिळाला आहे. तर दुसर्‍या बाजूला माण, खटाव सह कोरेगांव तालुक्यात चौफेर उधळणार्‍या आ. जयकुमार गोरे यांच्या वारुला वडूजकरांनी लगाम घातल्याची चर्चा आहे.
पाच महिन्यापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत काँग्रेसचे डॉ. महेश गुरव यांना नऊ तर विरोधी भाजपाचे अनिल माळी यांना आठ मते मिळाली होती. या निवडणूकीत डॉ. गुरव यांनी तीन अपक्षांची एकत्रित मोट बांधण्याबरोबर राष्ट्रवादीवर नाराज असणार्‍या सौ. सुनिता कुंभार यांना फोडण्यात यश मिळविले होते. त्यानंतर नगरपंचायतीची सुत्रे काँग्रेस व आमदार गटाच्या ताब्यात गेली होती.
राष्ट्रवादीची सावध पाऊले.
त्यावेळी झालेला दगाफटक्याने सावध झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच सावध पाऊले टाकण्यास सुरुवात केली होती. पक्षाने नाराज असणार्‍या सौ. कुंभार व त्यांच्या कुटुंबियांची समजूत काढून त्यांना पक्षाबरोबर राहण्यास प्रवृत्त केले. तर तीन अपक्षातील माजी उपनगराध्यक्ष संदिप गोडसे यांनाही आपल्या कळपात घेण्यास यश मिळविले. या सर्व सात सदस्यांची निगरानी युवा नेते सचिनशेठ माळी यांनी चांगल्या पध्दतीने केली. त्यांना काही झाले तरी भाजपाची साथ शेवटच्या क्षणी मिळेल याची खात्री होती. दुसर्‍या बाजूला मुळ बेरजेतून दोन नगरसेवकांची वजाबाकी झाल्याने निवडणूक एकतर्फीच होण्याची शक्यता होती. मात्र शहाजीराजेंचे सारथ्य करणार्‍या विजय शिंदे व डॉ. गुरव या चानाक्ष जोडीने भाजपाच्या तीन मतासाठी जोरदार फिल्डींग लावली. याकरीता त्यांनी आ. जयकुमार गोरे यांच्यासह नुतन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही कामास लावले. त्या दोघांनी शहाजीराजेंची निवड नगराध्यक्षपदी झाली तर पक्षाच्या पथ्यावर पडेल असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या गळी उतरवले. खासदार व आमदारांचा एकत्रित आग्रह झाल्यामुळे चंद्रकांतदादाही शहाजी गोडसेंसाठी राजी झाले व त्यांनी लागलीच माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकरांना त्यासंबंधात सुचनाही केल्याचे समजते. मात्र स्थानिक परस्थिती, नगरसेवकांची मते आजमावून न घेता थेट आदेश निघाल्यामुळे डॉ. येळगांवकरांसह भाजपाचे दोन नगरसेवक चांगलेच अस्वस्थ झाले. परस्थिती हाताबाहेर गेली होती. अश्यावेळी नगराध्यक्ष सुनिल गोडसे यांचे निमगांव येथील सासरवाडीचे नाते कामी आले. त्यांचे सासरे हिंदकेसरी रावसाहेब मगर हे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांनी जावयाकरीता मोहिते-पाटलांच्या माध्यमातून गळ घातली. तर दुसर्‍या बाजूला हिंदुराव आण्णा व पुसेसावळी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रदादा पवार या दोघांतील अनेक वर्षाचा दोस्ताना कामी आला. जितेंद्रदादांनी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्या माध्यमातून यशस्वी शिष्टाई केली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा दबाव कमी झाल्याने राष्ट्रवादीचे पाच, भाजपाचे तीन व दोन अपक्ष अश्या दहा जणांची गोळाबेरीज झाली. व दहा विरुध्द सात मतांनी सुनिल गोडसे यांचा विजय झाला. तर भाजपच्या किशोरी पाटील यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध लॉटरी लागली. या दोन निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस विशेषत: माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीपराव येळगांवकर, यांच्या गटाला चांगला दिलासा मिळाला. अन्यथा निवडणूकीत उलटे चित्र झाले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिशाहीन झाले असते. तर भाजपाच्या गटात फुट पडण्याची शक्यता होती.
आ. गोरेंच्या वारुला लगाम
दहिवडी येथील नगराध्यक्ष पदासाठी दिलीपभाऊ जाधव, माजी सरपंच धनाजी जाधव, युवा नेते सतिश जाधव या तिघांमध्ये मोठी रस्सीखेच होती. मात्र शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या मदतीने आ. गोरे यांनी हा तिढा अलगदपणे सोडविला. दिलीपभाऊ सारख्या अनुभवी व परिपक्व कार्यकर्त्यास उपनगराध्यक्ष पदावरुन नगराध्यक्षपदी बढती देताना जयाभाऊंनी विधानसभेचे पक्के गणित डोक्यात ठेवले आहे. दुसर्‍या बाजूला कोरेगांवमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी सलगी करत माजी जिल्हा परिषद सदस्य किरणनाना बर्गे यांच्या गटाच्या सौ. रेश्मा कोकरे यांना अलगदपणे नगराध्यक्षपदी बसविले. दोन महत्वाच्या नगरपंचायतीवर कब्जा केल्याने जयाभाऊंनी आपले जिल्हा स्तरावरचे नेतृत्व सिध्द केले होते. वडूजमध्येही भाजपाच्या खासदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा त्यांचा डाव होता. मात्र त्यांचा हा नेक इरादा उधळून लावत वडूजकरांनी जिल्हाभर उधळू पाहणार्‍या आ. गोरे यांच्या वारुला लगाम लावल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular