औंध : औंध येथील श्रीभवानी बालविद्या मंदिर मधील इ.पहिली ते चौथीमधील सुमारे दोनशे पन्नास चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पध्दतीचा आठवडी बाजार भरवून ज्ञानरचनावादावर आधारित स्वानुभवातून व्यावहारिक ज्ञान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या बाजारामध्ये भाजीपाला, फळफळाव यापासून ते विविध प्रकारची खेळणी, कडधान्य, किराणा साहित्य विक्रीचे स्टाँल्स ही या बाजारात लावण्यात आले होते. यावेळी भरविलेल्या वैविध्यपूर्ण बाजाराची चर्चा सर्वत्र सुरू होती.
विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळाले पाहिजे. या भूमिकेतून शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातील एक ग्रामीण जीवनाचा अविभाज्य अंग असलेल्या आठवडी बाजाराचा अनुभव चिमुकल्यांना मिळावा यासाठी येथील श्रीभवानी बाल विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका संजीवनी देशमुख व सर्व शिक्षकांनी मागील चार ते पाच दिवसांपासून तयारी करून शाळेच्या प्रांगणात सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांच्या मदतीने अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने आठवडी बाजार भरविला होता. या बाजारात शेतकरी, खेळणी विक्रेते तसेच अन्य विविध प्रकारचे व्यावसायिक आल्याचा अनुभव चिमुकल्यांनी केलेल्या वेगवेगळ्या पोशाखातील पेहरावामुळे येत होता.भाजी घ्या,फळे घ्या,धान्य घ्या ,ताजी ताजी फुले घ्या या व अशा अनेक गंमतीशीर आरोळया ,घोषणांनी बाजार परिसर दणाणून गेला होता.
यावेळी पालक, ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने विविध वस्तू ,भाजीपाला, धान्याची खरेदी करत होते. यामुळे चिमुकल्यांना पैशांचे व्यवहार, वस्तूंच्या ,साहित्य विक्रीचे ज्ञान मिळाले. अवघ्या तीन ते चार तासात हजारो रूपयांची उलाढाल झाली. शिक्षक, विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे औंध शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, पालक,ग्रामस्थांनी कौतुक केले.
औंध येथील श्रीभवानी बालविद्या मंदिरमध्ये भरला आगळा वेगळा आठवडी बाजार; वस्तू खरेदी विक्रीतून घेतले व्यावहारिक ज्ञान; पालक,ग्रामस्थ, शिक्षकांनी टाकली कौतुकाची थाप
RELATED ARTICLES