सातारा : गेल्या 14 वर्षांपासून फक्त आरोग्य या विषयाला वाहिलेल्या व फक्त आरोग्य विषयक जनजागृती करणारे मराठी भाषेतील लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे एकमेव मासिक असलेल्या ‘आरोग्य स्पंदन’ मासिकाच्या वाटचालीत सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे. जनतेचे आरोग्य विषयक प्रबोधन करणाऱ्या या मासिकाला गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी आय एस ओ 9001:2015 मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती मुख्य संपादक सुदेश आर. भोसले व संपादक संग्राम निकाळजे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, आरोग्य हा मानवी जीवनातील जिव्हाळ्याचा विषय आहे. आरोग्य चांगले असेल तर चांगले जीवनही जगता येते. आरोग्य क्षेत्रात आधुनिक सोयीसुविधा निर्माण झालेल्या आहेत या सुविधांविषयी लोकांना माहिती मिळावी तसेच आहार, विहाराच्या माध्यमातून चांगले आरोग्य कसे राखता येईल, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबत महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचे लेख ‘आरोग्य स्पंदन’ मासिकातून सातत्याने प्रकाशित होत असतात. या मासिकाचे कार्पोरेट कार्यालय मुंबईत असून रजिस्टरर्ड कार्यालय सातारा येथे आहे.
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील सोयीसुविधा, सर्वसामान्य रुग्णांसाठी उपचार असलेल्या उपचार सुविधांबरोबरच महिलांच्या आरोग्य विषयी भाष्य करुन खऱ्या अर्थाने ‘आरोग्य स्पंदन’ मासिकाने मराठी साहित्य शारदेच्या साहित्यिक वैभवात भर घातलेली आहे. गेल्या 14 वर्षांपासून अविरतपणे फक्त आरोग्य विषयाला वाहिलेल्या या मासिकाचे वाचक परदेशात देखील आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथीमधील सम्रग मार्गदर्शन, आहार, विहार, व्यायाम व मानसिक, शारीरीक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्वांना हे मासिक मार्गदर्शक ठरलेले असून मुद्देसूद मांडणी, आकर्षक छपाई यामुळे लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या मासिकाच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची दखल अमेरिकेतील युनायटेड ॲक्रेडिटेशन फाऊंडेशन मान्यताप्राप्त बीएमजी कॉन्फरमिटी असाईमेंट सर्व्हिस प्रा. लि. या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेत ‘आरोग्य स्पंदन’ मासिकास आरोग्य स्पंदन मासिकाला आय एस ओ 9001:2015 मानांकन बहाल केले आहे.
‘आरोग्य स्पंदन’ मासिकाला आरोग्य क्षेत्रात करत असलेल्या कामगिरीबद्दल यापूर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. असंख्य वाचकांच्या व जाहिरातदारांच्या पाठबळावर मासिकाची यशस्वी वाटचाल सुरु असताना मासिकास आय एस ओ 9001:2015 मानांकन मिळाले असून ही बाब ‘आरोग्य स्पंदन’च्या वाचकांसह ‘आरोग्य स्पंदन’ परिवारासाठी अभिमानास्पद अशीच असल्याची भावना मुख्य संपादक सुदेश आर. भोसले यांनी व्यक्त केली आहे. या यशाबद्दल त्यांनी संपादक संग्राम निकाळजे यांच्यासह सर्व टीमचे खास अभिनंदनही केले आहे.