Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीपोवई नाक्यावरील सिटीसेंटर समोरील भिंत जेसिबीने जमिनदोस्त

पोवई नाक्यावरील सिटीसेंटर समोरील भिंत जेसिबीने जमिनदोस्त

सातारा :  पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोवई नाक्यावरील सिटीसेंटर या इमारती समोरील अतिक्रमण भिंत जमिनदोस्त करून परीसर मोकळा केला. शिक्षक बँक ते तहसिलदार कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरील उर्वरीत खोकी धारकांनी टपर्‍या काढून घ्याव्यात अन्यथा जेसीबीने हटविल्या जातील असा इशारा अतिक्रमण पथकातील शैलेश आष्टेकर, प्रशांत निकम या अधिकार्‍यांनी दिला आहे. अतिक्रमण पथकाच्या कारवाईच्या इशार्‍यानंतर अनेक टपरीधारकांनी स्वत:हुन अतिक्रमणे काढून पालिकेच्या अतिक्रमण पथकाला सहकार्य केले. दरम्यान पोवई नाक्यावरील रस्त्यावरील अतिक्रणे काढल्यामुळे नागरीकांनी पालिकेच्या पथकाचे अभिनंदन केले. सिटीसेंटर इमारतीसमोरील भिंत आणि पेव्हर टाकून अडविण्यात आलेला रस्ता मोकळा केल्याने नागरीकांना पार्किग करणे सुलभ होणार आहे.
सातारा शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर सर्वच स्तरातून टिका होवू लागल्यानंतर पालिकेच्या पदाधिकार्‍यानी अतिक्रमण हा विषय गांभीर्याने घेतला आहे. आघाडीचे नेते श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांनीही अधिकार्‍यांची बैठक घेवून तुमचा तुम्ही निर्णय घ्या, अशा सुचना केल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने पोवई नाक्यावरील शिक्षक बँकेपासून सिटीसेंटर इमारत ते तहसीलदार कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. दरम्यान दुसर्‍या दिवशीही पोवई नाक्यावर अतिक्रमण मोहिम सुरू असताना टपरीधारकांंच्या गर्दीमुळे तणावाचे वातावरण बनले होते.
मरगळलेल्या अतिक्रमण पथकाने शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढचे पाऊल उचलले आहे. शहरातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमण विभागाने शहर पोलीस ठाण्याकडे पोलीस बंदोबस्त मागितला होता. शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. सारंगकर यांनी  पोलीस बंदोबस्त दिल्यानंतर सातारा पालिकेच्या अतिक्रमण पथकाने मोहिम सुरू केली आहे. अतिक्रमण पथकाने बुधवारी दुपारी पोवई नाक्यावरील अतिक्रम मोहिम राबवली.पोलीस बंदोबस्तात अतिक्रम पथक नाक्यावर दाखल झाल्यानंतर टपरीधारकांची पळता भुई थोडी झाली. कारण यापुर्वी पालिकेने या टपरी धारकांना स्वत:हुन अतिक्रमणे काढण्याबाबत नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही टपरी धारकांनी टपर्‍या काढल्या नव्हत्या. पोलीस बंदोबस्ता अतिक्रमण मोहिम सुरू झाल्यानंतर टपरीधारकांनी स्वत:हुन अतिक्रमणे काढून घेतली. उर्वरीत टपरीधारकांना उद्यापर्यंत मुदत दिली आहे.
पालिकेच्या अतिक्रमण पथकातील अधिकारी शैलेश आष्टेकर, प्रशांत निकम, भागनिरीक्षक गोविंदे मोहिते, सतीश साखरे, श्रीकांत गोडसे, प्रकाश राजेशिर्के यांच्या पथकाने दिवसभर पोवई नाका परीसरातील अतिक्रमणे जेसीबीने हटविली. यापुढे ही मोहिम सुरूच रहाणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे काढली जाणार आहेत. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. ज्यांची अतिक्रमणे आहेत अशा अतिक्रमणधारकांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. कारवाई पुर्वीच व्यवसायीकांनी अतिक्रमणे काढून टाकावी असे आवाहन पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. शिक्षक बँक ते तहसिलदार कार्यालयाच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्यामुळे रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular