Friday, October 17, 2025
Homeताज्या घडामोडीविरोधी उमेदवारांच्या बाष्कळ बडबडीने मला काहीच फरक पडत नाहीः आ.शशिकांत शिंदे

विरोधी उमेदवारांच्या बाष्कळ बडबडीने मला काहीच फरक पडत नाहीः आ.शशिकांत शिंदे

महाबळेश्वर : आजवर मी मोदींवर टीका करायचो, विरोधी उमेदवारावर कधीच बोलत नव्हतो. राजकारणातील संकेत आम्ही इमाने इतबारे पाळत होतो. मात्र कोरेगावच्या सभेत युतीच्या उमेदवाराने सर्व संकेत पायधुळी तुडवले. परंतू आम्हालाही टीका करता येते याचे भान त्यांनी ठेवावे. लोकसभेनंतर आमदारकीची वाट पाहतोय, या त्यांच्या विधानाला सडेतोड उत्तर असून त्यांच्या बाष्कळ बडबडीने मला काहीच फरक पडत नाही, अशी स्पष्टोक्ती आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोगवे ता. महाबळेश्वर येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाबूराव सपकाळ, जिल्हा बँक संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, पं. स. उपसभापती अंजनाताई कदम, संजय गायकवाड, नवी मुंबईचे नगरसेवक शंकरशेठ मोरे आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, कै. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी संघटना घडवली. त्यांचा पहिला पुतळा गोगवे गावात उभारण्यात आला याचा मला अभिमान वाटतो. यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील आणि शरद पवासाहेबांचे अण्णासाहेबांना मोठे पाठबळ मिळाले. माथाडी कामगार कायदा झाल्याने माझे बांधव सुरक्षित झाले व परिस्थिती सुधारली. मात्र पुनर्वसन रखडल्याने इथे भागत नाही म्हणून लाल मातीतला शेतकरी मुंबईत जाऊन माथाडी कामगार झाला. आम्ही सारेजण या माथाडी संघटनेतच काम करतो. आजच्या सभेला एक माथाडीचा मुलगा व जावळीचा सुपुत्र म्हणून मी आलो आहे. माणूस मोठा होतो, तो त्याच्या कामामुळे आणि कर्तृत्वामुळे. कोयना- कांदाटी खोर्‍यातील जनतेमुळेच मी घडलो. माथाडीचे नेते कै. अण्णासाहेब पाटील व माथाडी बांधव यांच्यामुळेच मी आज उभा आहे. शरदरावजी पवार व अजितदादांच्या आशीर्वादामुळे राजकारणात पुढे आलो. ज्यांच्यामुळे मोठा झालो त्यांना मी कधीच विसरणार नाही. याशिवाय माथाडी बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि उदयनराजेंना विक्रमी मतांनी निवडून द्या असे सांगण्यासाठी मी या सभेला आलो आहे.
विरोधी उमेदवारावर टीका करताना आमदार शिंदे म्हणाले की, अण्णासाहेबांचे सुपुत्र म्हणून पवारसाहेबांनी तुम्हाला आमदार केले. मात्र तुम्ही भाजपात जायचे ठरवले. आम्ही विरोध केला नाही मात्र तुम्ही ज्यांची तळी उचलता आहात ते भाजप सरकार अण्णासाहेबांनी उभ्या केलेल्या संस्थांवर डोळा ठेऊन आहेत. त्यांनी पतपेढी उभी केली व वाढवली आणि अनेकांना आधार दिला. मात्र यापुढे वसुली करायची नाही अस निर्णय सरकारने घेतला व पतपेढीची कपात होत नसल्याने संथेपुढे अडचणी उभ्या राहत आहेत. त्यामुळे हे सरकार माथाडींच्या पाठीशी हात धुवून लागले आहे. शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणारे महाराजांच्या 13 व्या वंशजाबद्दल चुकीची व अशोभनीय भाषा वापरतात. असा कृतघ्नपणा करताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही. आम्ही कितीही मोठे झालो तरी ज्यांनी घडवले त्यांना कदापि विसरत नाही आणि विसरनारही नाही असेही आमदार शिंदे या वेळी म्हणाले
खा श्री छ उदयनराजे भोसले म्हणाले की, माझी दहशत आहे अशी टीका करणार्‍या विरोधकांना मी सांगू इच्छतो की, ही केवळ माझीच दहशत नाही तर खर्‍या अर्थाने बाळासाहेब भिलारे, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील अश्या सर्वांचीच दहशत आहे. कारण हे सर्व जण कामातून उभे राहिले आहेत. लोकहितासाठी ते सतत झटत असतात त्यामुळे ही दहशत आदरयुक्त प्रेमाची आहे. वाम मार्गाने पैसे मिळवणे सोपे असते. मात्र प्रतिष्ठा सेवाकार्यातुनच मिळते. त्यामुळे विरोधकांनी भान ठेऊन बोलवे. आम्ही छत्रपतींच्या घराण्यात जन्माला आलो असलो, तरी आम्ही लोकांकडून दहशतीने आदर मिळवला नाही. कामावर बोला पण चरित्रहनन करून उगाच चिखलफेक करू नका. तुम्ही ज्या पक्षात गेला तिथे चिखलचा चिखल आहे. लवकरच तुम्हाला वस्तुस्थिती समजून येईल. ज्या शेतकर्‍यांच्या बहुमतावर सध्याचे सरकार स्थापन झाले, त्या सरकारची धोरणे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे तोरण बांधत आहेत, याची या सरकारला लाज कशी वाटत नाही. बहुमताच्या जोरावर सरकारला खूप चांगले निर्णय घेता आले असते. पण यांना कोणी अडवले होते? विरोधी उमेदवार अमुक करतो, तमुक करतो असे शब्द वापरतो. मात्र त्यांचे तोंड आहे, त्यांनी काय बोलावे त्यांचा प्रश्न आहे. परंतू यापुढे अशी बेताल विधाने करू नका. माझ्याबद्दल बोललं तर 23 तारखेनंतर सर्व काही स्पष्ट होईल. या देशात सत्तांतर घडणार असून त्यासाठी डोंगरदर्यातील जनता मतपेटीतून क्रांती घडवेल, असा मला विश्वास आहे
आमदार मकरंद पाटील म्हणाले की, पवारसाहेबांनी महाआघाडीचे उमेदवार म्हणून सलग तिसर्‍यांदा महाराजांना संधी दिली आहे. त्यामुळे वाई- महाबळेशवर- खंडाळा या माझ्या मतदारसंघातून सर्वाधिक मते देण्यात आम्ही कुठेही कसूर ठेवणार नाही असा मला विश्वास आहे. सध्याच्या सरकारने मराठा, मुस्लिम आणि धनगर समजाला आरक्षणाचे केवळ आश्वासन दिले, मात्र त्याची अंमलबजावणी न करता त्यांनी फसवणूकच केली आहे. या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. यापूर्वी असे चित्र कधीच दिसून आले नव्हते, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
यावेळी बाळासाहेब भिलारे, बाबूराव सपकाळ यांची भाषणे झाली. सभेस बाजार समिती उपसभापती संजय मोरे, कोंडिबा जाधव, प्रविण भिलारे, संतोष जाधव, सुभाष सोंडकर, विजयराव भिलारे, जगन्नाथ शिंदे, संजय देसाई, सुभाष कदम, सुभाष कारंडे, निवास शिंदे, बाळासाहेब ननावरे, बाळासाहेब चोरगे तसेच कोयना-कांदाटी-सोळशी खोरे विभागातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular