सातारा : सामाजिक स्तरावरील विविध प्रश्नांबाबत भासरिप पक्षाने गेले सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. गुरूवार दिं. 28 रोजी भिमशक्तीचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब शिरसट यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी या चक्री उपोषणाला जाहिर पाठींबा दिला आहे. या पाठींब्यामुळे जिल्हा प्रशासनाने विविध प्रश्नांबाबत आंदोलनकांशी चर्चा करण्याची भुमिका घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान भासरिप पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.
देशातील विविध समस्या, मागासवर्गीय तसेच सरकारी नोकरांच्या सेवानिवृत्ती वेतनाचे प्रश्न, खाजगी जागांवरील आरक्षण, नोकर भरती, शेतकर्यांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांसाठी पद्मश्री लक्ष्मण माने, जिल्हाध्यक्ष मल्हारी जाधव यांनी गेल्या सात दिवसांपासून चक्री उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शाहिर संभाजी भगत, भारिप बहुजन महासंघाचे चंद्रकांत खंडाईत, रिपब्लीकन पक्षाचे दादा ओहाळ, मदन खंकाळ, ओबीसी संघटनेचे नेते नेताजी गुरव, गणेश भिसे, भालचंद्र माळी, दलित महिला विकास आघाडीच्या अॅड. वर्षा देशपांडे, अशोक लिपारे यांच्यासह विविध मान्यवरांनी पाठींबा दिला आहे.
जिल्हाधिकारी सिंघल यांनी माझ्यापर्यंत निवेदन आले नाही असे सांगून पत्रकाव्दारे खुलासा केला होता. जिल्हाधिकार्यांच्या खुलाशावर प्रतिक्रीया देताना वामन मस्के म्हणाले, वर्षातील शंभर दिवस सातारा जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी सातारा जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत त्यांनी काय पाठपुरावा केला, आत्तापर्यंत आलेल्या निवेदनांची दखल घेवून किती प्रश्न सोडविले? याचा लेखा-जोखा दिला असता तर जनतेला जिल्हा प्रश्नासनाचे लोकाभिमुख कारभार समजला असता. आजही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देवून सर्वसामान्य जनता आंदोलन करीत आहे. याची दखल जिल्हाधिकार्यांनी घ्यावी. उद्या अधिकृतरित्या त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यावेळी त्यांनी हे प्रश्न किती दिवसात सोडविला जाईल याचे आम्हाला लेखी माहिती द्यावी. जिल्हाधिकारी या महिला असल्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. कुणाच्यातरी सांगण्यावरून त्यांनी पत्रकाव्दारे खुलासा केला असे आम्ही समजतो असे मस्के यांनी स्पष्ट केले.