सातारा : पालिकेने स्वच्छता मोहिमेत सक्रिय कार्यक्रम राबवताना ओला-सुक्या कचर्याची जनजागृती केली. शहरातील भिंतींवर स्वच्छ्तेचा संदेश रेखाटण्यापूर्वी पालिकेने इमारतीवर स्वच्छेतेचा नारा देत रंगरंगोटी केली आहे. आता आरोग्य विभागातील बिगारी आणि सफाई कामगार यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार असल्याची माहिती आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी दिली.
पालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता कामासाठी 265 कर्मचारी नियुक्त आहेत. याकामी 20 प्रभागात 20 मुकादम नियुक्त असून प्रायोगिक तत्वावर 4 प्रभागांमध्ये 98 कर्मचार्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे.
यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात दोन बायोमेट्रिक मशिन उपलब्ध करून संबंधित मुकादमांना मशीन हाताळण्याचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. या मशिनद्वारे दिवसातून चारवेळा आरोग्य कर्मचार्यांची हजेरी घेतली जाणार असून आतापर्यंत वापरातले हजेरी पुस्तक आता पालिकेतून हद्दपार होणार आहे.
नवीन प्रणालीमुळे कामकाजात सुधारणा होणार असून शहरातील कचर्याचा प्रश्न अधिक चिकित्सकपणे सोडवला जाणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी स्वच्छ भारत मोबाईल ऍपच्या माध्यमातून दाखल कराव्यात असे आवाहन आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी केले आहे.