सातारा : खा. उदयनराजे भोसले हेच मुक्त विद्यापीठ आहेत. तेच शासन करतात, प्रेमही तेच देतात, अन्यायाविरोधात लढाही देतात. त्यांनी खर्या अर्थाने सातारा जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिले आहे, सातारा शहराच्या विकासाला चालना मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन त्यांनी ग्रेडसेपरेटर (भुयारी मार्गाला) मंजूरी आणली. यामुळे आता शहरात वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे. ते माझ्याकडे थेट येतात पण स्वत:ची कामे घेवून नाही तर रयतेची कामे घेवूनच येतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कास धरणाची उंची वाढविणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, भुयारी गटार योजना या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सातारा जिल्हा परिदेच्या मैदानावर आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार समारंभात मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीष महाजन, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, श्री. छ. शिवाजीराजे भोसले, आ. शंभूराज देसाई, आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, माजी खासदार गजानन बाबर, माजी आ. कांताताई नलवडे, अॅड. भरत पाटील, नगरसेवक विजय काटवटे, शिवाजीराव शिंदे, माजी सभापती देवराज दादा पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जि. प. माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मंचावर आयोजित केलेला कार्यक्रम हा काही कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही, छ. शिवाजी महाराजांनी मोघलांच्या विरोधात लढा पुकारुन त्यांना सळो की पळो करुन सोडले. तसेच 18 पगड जातीच्या लोकांना त्यांनी बरोबर घेवून असूरी शक्तीच्या विरोधात लढा दिला, त्याच्याच विचारावर त्याचे थेट वंशज खा. उदयनराजे भोसले यांनी पाऊल ठेवून काम सुरु ठेवले आहे. आम्ही त्याच्यावर प्रेम करतो ते छत्रपती म्हणून खा. उदयनराजे भोसले यांनी आमच्याकडे सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न, वैद्यकीय महाविद्यालयं व अजिंक्यतार्याच्या विकासासाठी 25 कोटीच्या निधीचा प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी लाभ त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले, तीनशे ते साडे तीनशे वर्षापासून छ. शिवाजी महाराजांचा इतिहास उभा राहिला आहे. आजचा कार्यक्रम हा ऐतिहासिक आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री श्री. छ. राजमाता कल्पनाराजे भोसले या व्यासपीठावर न बसता रयतेमध्ये जावून पुढे बसल्या आहेत. उदयनराजेंच्या जन्मदिवसा दिवशीच त्यांना रयतेचा विसर पडलेला नाही. देशात औसुक्त जास्त कुणाला असेल तर ते उदयनराजेंनाच असेल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छ. शिवाजी महाराज यांचा वारसा ते जपत आहेत, त्यांनी कधीही स्वत:ची जाहिरातबाजी केली नाही की ते लोकांना सांगत नाहीत हा त्यांचा मोठेपणा आहे. जनतेच्या सेवेसाठी त्यांनी कायम रहावे उत्तम आरोग्य व दिर्घ आयुष्य त्यांना लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी उदयनराजेंना या निमित्ताने दिल्या.
ना. विजय बापू शिवतारे म्हणाले, पोवई नाका येेथे आठ रस्ते आहेत तेथे 60 कोटीचा ग्रेडसेपरेटर भुयारीतली कामाचा शुभारंभ करण्यात आला. मी पालकमंत्री झाल्यानंतर आज अखेरपर्यंत शहराच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी उदयनराजे भोसले यांनी साथ दिली. रयतेचे राजे म्हणून त्यांचा दरारा कायम राहील.
ना. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, केवळ वाढदिवस साजरा न करता खा. उदयनराजे भोसले यांनी सातारा शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विविध विकास कामांचा शुभरंभ केला. त्यामध्ये पोवई नाक्यावरील ग्रेडसेपरेटर कामामुळे वाहतूक व्यवस्था सुलभ होण्यास मुदत होईल. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. शंभूराज देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या प्रश्नासाठी काम करीत राहीन. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर तुमचा मित्र म्हणून मला त्या सांगाव्यात, मी तुमचाच आहे, तुमचाच राहीन.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. विजयबापू शिवतारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ, अजिंक्यतार्याची प्रतिकृती खा. उदयनराजे भोसले यांना देवून सत्कार करण्यात आला. कण्हेर येथे 350 कोटीचा फिश पार्क करण्याचे जाहीर करण्यात आले. वनवासवाडी गटाच्यावतीने खा. उदयनराजे भोसले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गाडगीळ यांनी केले. आभार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरीक, मावळे उपस्थित होते.
सत्कारात हाराच्या बाहेर शरद पवार
खा. उदयनराजे भोसले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. विजयबापू शिवतारे, ना. गिरीष महाजन या मान्यवरांच्या उपस्थितीत एक हार घालून सत्कार करताना खा. शरद पवार यांनी स्वत:ला घेतलेला हार बाहेर काढल्याने राजकीय वर्तुळात एक चर्चेच्या औत्सुक्य निर्माण झाले होते.

ड्रोन कॅमर्याद्वारे शुटींग
जि. प. च्या मैदानावर या ऐतिहासिक कार्यक्रमात प्रत्येक क्षणाचे चित्रीकरण ड्रोन कॅमेर्याद्वारे शुटींग करण्यात येत होते. मैदानावर खचाखच गर्दी असल्याने प्रत्येक क्षण लोकांना सहज पहाता यावा म्हणून भव्य स्क्रीनद्वारे माहिती मिळत होती.
वाढदिवसाला राष्ट्रवादी आमदारांची दांडी
तिसर्या खासदारकीचा घाट इतका सोपा नसल्याचा अनुभव राजे समर्थकांना . शनिवारी संध्याकाळ पासूनच येऊ लागला . खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवस कार्यक्रमावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी थोरल्या पवारांच्या समक्ष एका खाजगी हॉटेल मध्ये बैठक घेउन बहिष्काराचा निर्णय घेतला . एकीकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री विजय बापू शिवतारे यांच्यासमवेत उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत असताना राष्ट्रवादीने बहिष्काराचे अस्त्र उगारत पुन्हा राजे विरोधी राजकारणाला फोडणी दिली .
सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे की नाही? यावर आज, नेत्यांची एक प्रदीर्घ बैठक झाली. त्यात कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला. पण, पक्षाध्यक्ष शरद पवार मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला काही काळ स्वतः खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वाढदिवस कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उदयनराजे आणि पक्षाध्यक्ष शरद पवार बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत गुप्त बैठक सुरू होती. त्यात वाढदिवसाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यावर शिक्कामोर्तब झाले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद होते. त्यापार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्यांची बैठक बोलविण्यात आली होती.
बैठकीला रामराजे नाईक, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पवार पुन्हा कार्यक्रमाला
हॉटेल प्रीती एकझिक्युटिव्ह मध्ये शरद पवार यांच्याकडे उदयनराजे यांच्या वाढदिवसाला जाऊ नये असा सूर राष्ट्रवादीच्या आमदारांनी लावल. हॉटेलच्या खास सूटमध्ये थोरल्या पवारांनी दुपारी पावणेतीन वाजल्यापासूनच तळ दिला होता. कारण राष्ट्रवादीच्या गोटात संभ्रमाचे वातावरण होते . तासाभराच्या बैठकीतही बहिष्कार विरोधाचा सूर तीव्रच राहिला. पवार उठून गेल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बैठकीला मार्गदर्शन केले.