रहिमतपूर : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे चौंडेश्वरी मंदीराच्या पाठीमागे आटाळी नावाच्या शिवारात माजी नगरसेवक शंकर भोसले यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड सुरु असताना ऊस तोड मजुरांना बिबट्या सदृश्य वाणाची दोन पिल्ले सापडली. ती हुबेहुब बिबट्यांच्या पिल्लांसारखी दिसत असल्याने मुजरांना ती बिबट्याची पिल्ले आहेत असे वाटले. पण प्रत्यक्षात ती रान माजरांची पिल्ले असल्याचे वनविभागाचे वनपाल रहिमतपूर राऊंड सुभाष पाटील व वनसंरक्षक नवनाथ कोळेकर यांनी सांगितले.
परंतु, बिबट्याची पिल्ले सापडल्याची बातमी शहरात व परिसरात वार्यासारखी पसरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. बातमीचे गांभीर्य पाहता रहिमतपूर पोलीस ठाण्यात पोहताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, सहाय्यक पोलीस फौजदार सुनील कांबळे, पोलीस नाईक जगदीश कणसे यांनी घटनास्थळाकडे तोबडतोब येवून माहिती घेतली. दरम्यान वनविभागाचे अधिकारी दाखल झाले त्यांनी त्या पिल्लांची खात्री करुन ती पिल्ले रानमाजरांची असल्याचे सांगितले व रानमाजरांची पिल्ले ताब्यात घेतली. वस्तुस्थिती कळल्यामुळे कामगारांनी, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.