सातारा : प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढतानाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. जोडीला लाईट आणि साउंड शोही सुरु करण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबतची घोषणा केली. येत्या ६ जून रोजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
याबाबतची घोषणा करताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, हिंदू एकता आंदोलन सातारा आणि इतर संघटनांकडून या पुतळ्याबाबत मागणी करण्यात येत होती. शिवभक्तांच्या या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे.