पाटण :- हिंदवी स्वराजाची तिसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगडाहून भूवैकुंठ पंढरीतील विठोबाच्या भेटीस दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान नित्य प्रथेप्रमाणे ज्येष्ठ वैद्य चतुर्थी, श्री राजाभिषेक शक ३४८ तद्नुसार यावर्षी सोमवार दि. २९ जून रोजी सकाळी ९ वाजता रायगडावरील छ. श्री शिवाजी महाराज समाधी मेघडंबरीपासून होणार आहे. गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी रायगड ते पंढरपूर असा पालखी सोहळा डोक्यावर घेवूनच पायी होणार असल्याचे सोहळा व्यवस्थापन समितीकडून जाहीर करण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीमुळे शिवरायांच्या पादुका चक्क डोक्यावर घेवूनच केवळ पाच शिवभक्त धारकरी रायगडावरून पंढरीस जाणार आहेत. गेल्यावर्षीही कोरोनाच्या प्रकोपामुळे रायगडावरून केवळ तीनच शिवभक्त शिवरायांच्या पादुकांना घेवून पंढरपूरला गेले होते. समाजस्वास्थ्याची अत्यावश्यक काळजी घेवून, गर्दी न जमवता पादुकांच्या प्रवासाची मााहिती न लागता, पायी पालखी सोहळ्याची परंपरा अगदीच सुरक्षितपणे जपता येवू शकते याचा सर्वोत्तम आदर्श शिवरायांच्या याच पालखी सोहळ्याने गेल्यावर्षी घालून दिला होता.
जगदीश्वराचे व शिर्काईचे दर्शन घेवून राजसदर रायगडाहून प्रस्थान केल्यानंतर छ. शिवरायांच्या पादुकांचा पहिला विसावा पाचाडमधील जिजाऊ मॉंसाहेबांच्या समाधी छत्रीजवळ असेल. आऊसाहेबांचा आशिर्वाद व निरोप घेवून सोहळा पहिल्या मुक्कामी पळसगाव खुर्दमधील मारूती मंदिरात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा मुक्काम श्रीरामपूरमध्ये करून सोहळा तिसऱ्या दिवशीच्या मुक्कामास दि. ३० जून २०२१ रोजी ऐतिहासिक ताम्हिणी घाटातील जुन्या पाऊलवाटेने पुणे जिल्ह्याच्या सीमेवर मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावात येईल. तेथून मजलदरमजल करत शिवाजी महाराज ज्येष्ठ शुध्द दशमी दि. ४ जुलैला तुकोबारायांच्या पालखी मार्गावर सामील होण्यासाठी पुण्यनगरीत दाखल होतील. भागवतधर्माचे संवाहक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, माऊलींच्या वारीचे जनक जगद्गुरु तुकाराम महाराज व हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज यांच्य शक्तीधारा भक्तीसागर भेटीचा उत्सव एकादशीच्या सुमुहूर्तावर हडपसरला दि. ५ जुलैला पार पडून मग पालखी सोलापूर महामार्गाने चौफुला दौंड, माळेगाव, बारामती, इंदापूर, अकलूज, तोेंडले बोंडले, भाळवणीमार्गे आषाढ शुध्द दशमी दि. १९ जुलैला पांडुरंगाच्या दर्शन ओढीने पंढरपुरात मुक्कामी पोहोचेल. एकादशीला चंद्रभागास्थान व नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर वारीतील शिवबा-विठोबा भेटीचा सोहळा श्री विठ्ठल मंदिरात पार पडेल. गुरूपौर्णिमेस राष्ट्रसमर्पण अभिवादन असल्याने शिवरायांच्या पादुकांचा परतीचा प्रवास द्वादशीलाच वाहनाने होवून केवळ तीनच मुक्कामात पालखी २३ जुलैला पुन्हा रायगडी दाखल होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील समन्वय जागरण, रिंगण सोहळे याहीवर्षी होणार नाहीत. पाच वर्षातील रिंगणाची संकलित चित्रे, वर्तमानातील शिवभारत अंतर्गत व्याख्यानांचा ध्वनीमुद्रिका संच आणि पालखी विशेषांक संबंधित शाळांना पोहोच केले जातील. सकाळच्या प्रस्थानाची पूजा व शिववंदना, सायंकाळच्या विसाव्याची आरती व हरिपाठ सोडून बाकी सारे उपचार यावर्षीही होणार नाहीत. त्यानुसार यावर्षीही रायगड ते पंढरपूर असा पालखी सोहळा डोक्यावर घेवूनच होणार आहे. श्रींच्या पादुका दर्शनास कसलीही गर्दी न करण्याचे आवाहन सोहळा व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी योगेश शिंदे (8879124213) यांच्यशी संपर्क करावा.