सातारा : 4 जानेवारी रोजी स्वच्छ शहर सर्वेक्षण होणार असल्याने सातारा पालिकेने शहरात स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी स्वच्छता फेरी आयोजित केली असून पदाधिकारी, पालिका कर्मचारी-अधिकारी आणि शहरातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी या अभियानात सहभागी होणार असल्याची माहिती आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष राजू भोसले, पक्ष प्रतोद स्मिता घोडके, मनोज शेंडे, विशाल जाधव, सुनिता पवार आदी उपस्थित होते.
शहरातील ओला-सुका कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून संकलित केला जातो. या व्यतिरिक्त हॉटेल, वैद्यकीय आणि व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था पालिकेने केली आहे. सार्वजनिक शौचालयांना वीज, पाणी देण्यासह तक्रार पेटी बसवण्यात आली आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी शहरात 200 फ्लेक्स बोर्ड बसवले असून पालिकेच्या इमारतीसह पाण्याच्या टाक्यांवर आपला सातारा, स्वच्छ साताराचा नारा देण्यात आला आहे. लवकरच घनकचरा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार असून आरोग्य विभागातील कर्मचार्यांची बायोमेट्रीक हजेरी सुरू करण्यात आली आहे. स्वच्छतेची व्यापक जनजागृती करण्यासाठी मंगळवार, ता. 2 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता पालिकेपासून स्वच्छता फेरी सुरू करण्यात येणार आहे. यावेळी पालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक-कर्मचारी आणि शालेय मुलांसह शहरातील बचत गटांच्या महिला व सेवाभावी संस्था उपस्थित राहणार आहेत. तरी सातारकरांनी रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लेेवे यांनी केले.
पालिकेची शहरात स्वच्छता जनजागृती फेरी
RELATED ARTICLES

