Tuesday, December 2, 2025
Homeठळक घडामोडीमहाबळेश्वर पालिकेच्या महास्वच्छता अभियानास संघटनांची साथ ; महाबळेश्वर-वेण्णालेक या मुख्य रस्त्यासह प्रेक्षणीय...

महाबळेश्वर पालिकेच्या महास्वच्छता अभियानास संघटनांची साथ ; महाबळेश्वर-वेण्णालेक या मुख्य रस्त्यासह प्रेक्षणीय स्थळ परिसरात स्वच्छता मोहीम

महाबळेश्वर : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत महाबळेश्वर पालिकेच्या वतीने नवनवीन उपक्रम राबविले जात असून पालिकेच्या वतीने प्रथमच आयोजित केलेल्या महामॅरेथॉन स्पर्धेच्या यशानंतर महास्वच्छता अभियान स्पर्धेस प्रारंभ झाला असून स्वच्छ सर्वेक्षण 2018 साठी पालिकेने राबविलेल्या या महास्वच्छता अभियानास विविध संस्थांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये महाबळेश्वर हॉर्स अँड पोनी असो.च्या शंभरहून अधिक घोडा व्यावसायिकांसह वेण्णालेक वरील स्टॉल्स,स्ट्रॉबेरी व्यावसायिकांनी तर आपला एक दिवसाचा व्यवसाय बंद करून वेण्णालेक परिसराची स्वच्छता करीत पालिकेच्या या महास्वच्छता अभियानास साथ दिली.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 साठी महाबळेश्वर पालिकेने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत राज्यातच नव्हे तर देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.शहर स्वच्छतेसोबतच नागरिकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने प्रथमच महामॅरेथॉन सारख्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले तदनंतर पालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महास्वच्छता अभियान या स्पर्धेस प्रारंभ झाला असून या महास्वच्छता अभियान स्पर्धेसाठी पालिकेच्या वतीने प्रथम एक लाख रुपयाचे पारितोषिक व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे तर द्वितीय क्रमांकासाठी 50,000(पन्नास हजार) व तृतीय क्रमांकासाठी 25000 रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे पालिकेच्या वतीने प्रथमच महास्वच्छता अभियानासारखा उपक्रम स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत राबविण्यात येत असून या महास्वच्छता अभियान स्पर्धेसाठी महाबळेश्वरमधील संघटनांनी आपला सहभाग नोंदविला आहे या महास्वच्छता अभियानामध्ये विविध संघटना स्वयंस्फूर्तीने विविध प्रेक्षणीय स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवीत आहेत.जय गणेश मंडळाच्या सात महिला प्रसिद्ध विल्सन पॉईंट व परिसराची स्वच्छता स्वयंस्फुर्तीने करीत आहेत तर आधार फॉउंडेशन,सहयाद्री ट्रेकर्स,जय भवानी महिला बचत गट सारख्या सेवाभावी संस्थादेखील या अभियानामध्ये आपले योगदान देत आहेत या संस्था शहर परिसरासह विविध प्रेक्षणीय स्थळांची स्वच्छता करीत आहेत यासोबतच महाबळेश्वर हॉर्स अँड पोनी असो.च्या शंभरहून अधिक घोडा व्यावसायिकांसह वेण्णालेक वरील स्टॉल्स,स्ट्रॉबेरी व्यावसायिकांनी तर आपला एक दिवसाचा व्यवसाय बंद करुन या महास्वच्छता अभियानामध्ये पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत वेण्णालेक सह परिसर स्वच्छ केला.घोडे व्यावसायिकांनी घेतलेल्या स्वच्छता मोहिमेस नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी भेट देत मार्गदर्शन करताना म्हणाल्या स्वच्छता मोहीम ही फक्त सर्वेक्षणा पुरती मर्यादित न ठेवता त्यामध्ये सातत्य ठेवणार आहे.
महाबळेश्वर मधील संघटनांनी महिन्यातून एकदा अशी स्वच्छता मोहीम राबवून पालिकेस सहकार्य करावे जेणे करून शहर स्वच्छ सुंदर होण्यास मदत होईल.पालिका आपणास सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन देखील यावेळी दिले यावेळी उपनगराध्यक्ष अफझल सुतार नगरसेवक कुमार शिंदे हॉर्स अँड पोनी संघटनेचे अध्यक्ष जावेद खारकंडे आदी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण 2018 साठी सामाजिक संघटनांसोबतच रांजणवाडी येथील महिलांनी देखील या स्वच्छता मोहिमेत स्वयंस्फुर्तीने सहभागी होत परिसराच्या स्वच्छतेसह रंगरंगोटीचे काम हाती घेतल्याने या स्वच्छता मोहिमेला मोठी गती मिळाल्याचे चित्र असून स्थानिक स्वतः या मोहिमेत सहभागी होत आहेत.यामध्ये बचत गटाच्या महिलांना देखील पालिकेने स्वच्छाग्रही केले असून या माध्यमातून त्या देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाल्या आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular