पाटण :- गुरूवारी पाटण येथील कोरोना केअर सेंटरमधील ३४ व्यक्तींचे स्वॅप नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या या सेंटरमध्ये एकूण ४६ व्यक्ती विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्या आहेत. यापुर्वी म्हासोली येथील कोरोना बाधीत रूग्नांच्या संपर्कात आलेल्या तळमावले येथील सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तथापी भारसाखळे येथील संशयीत मृत व्यक्तीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे तर शिरळ येथील कोरोना बाधीत ७० वर्षीय वृध्दाचे मुलाला त्रास होत असल्याने त्याला कृष्णा हौस्पीटल कराड येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याची माहीती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.
तालुक्यात बनपुरी व शिरळ येथे कोरोना बाधीत रूग्ण सापडल्यानंतर स्थानिक प्रशासनाने आणखी कडक उपाययोजना राबविल्या आहेत . यापुर्वी म्हासोली येथील कोरोना बाधीत रूग्नांच्या संपर्कात आलेल्या पाटण तालुक्यातील तळमावले येथील नातेवाईक व संपर्कातील नऊ व्यक्तींना पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅप नमुने तपासणीसाठी पाठविले होते. गुरूवारी यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या सर्वजणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. तथापी बनपुरी येथील मयत वृद्ध महिलेचा तपासणी अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर त्यांचे नातेवाईक व संपर्कातील लोकांना पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याशिवाय शिरळ येथील ७० वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व ते गेलेल्या पाटण येथील खाजगी रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र हेळवाक, ग्रामीण रुग्णालय पाटण येथील डाॅक्टर्सना होम क्वारंटाइन तर इतरांना पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तर याच कोरोना बाधीत वृध्दाच्या मुलाला गुरुवारी त्रास जानवु लागल्याने त्याला कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याशिवाय भारसाखळे येथील मृत संशयीत व्यक्तीच्या कुटुंबीय व संपर्कातील व्यक्तींनाही पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी पुर्वी ज्यांचे स्वॅप नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी तळमावले येथील सर्वांचेच व पाटण शहरातील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. भारसाखळे येथील संशयीत मृत व्यक्तीचा स्वॅप नमुना मंगळवारी रात्री कराड येथेच घेवून त्यानंतरच त्यांचेवर कराडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते अद्याप त्यांचा व धामणी येथील एकाचा चाचणी अहवाल प्रलंबित आहे.
गुरूवारी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये कराड येथील टिम येवून ३४ व्यक्तींचे स्वॅप नमुने तपासणीसाठी घेऊन गेली आहे. यामध्ये पाटण, शिरळ, भारसाखळे, बनपुरी, आदी गावातील व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांचे तपासणी अहवाल शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी प्राप्त होतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तथापी कोरोनाचा पाटण तालुक्यात शिरकाव होताच तालुक्यातील बहुतांशी जनता, पदाधिकारी व कार्यकर्ते, व्यापारी यांनी प्रशासनाला सहकार्य करताना स्वयंस्फुर्तीने आठ दिवस अत्यावश्यक सेवेतील दवाखाने व औषध दुकाने वगळता सर्व बंद ठेवण्याचा स्वयंस्फुर्तीने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाटण शहरासह तालुक्यातील बहुतांशी बाजारपेठात शांतता व शुकशुकाट पहायला मिळत आहे. यानिमित्ताने कोरोनाची साखळी तोडणे व संपर्क टाळणे सोपे झाले आहे. मात्र हीच खबरदारी यापुढे कोरोना हद्दपार होईपर्यंत ठेवणे आवश्यक आहे. दरम्यान आता या संबंधितांच्या स्वॅप नमुने अहवाल काय येणार याकडे प्रशासनासह सामान्यांच्याही नजरा लागल्या आहेत.