पाटण : रविवारी रात्री उशिरा पाटण तालुक्यात सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या ८० झाली आहे. यापैकी ६० व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून चौघांचा मृत्यू तर उर्वरित सोळा बाधितांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी नव्याने आणखी चोवीस व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली. बाधितांच्या निकट संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईकांना येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
रविवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना पाॅझिटीव्ह अहवालात कोयना विभागातील गोवारे येथील दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय कोयनानगर येथील एक महिला, हावळेवाडी, पाळेकरवाडी, बागलवाडी (तळमावले) येथील प्रत्येकी एक पुरूष अशा ७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व रुग्णांना तातडीने कराड येथील कृष्णा हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या निकट संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदींना येथील प्रियदर्शनी महिला वसतीगृह व कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. रविवारी भालेकरवाडी तर सोमवारी उरूल व जांभेकरवाडी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोनामुक्त या रुग्णांना घरी सोडण्यात आले. तथापी जांभेकरवाडी येथील कोरोनामुक्त व्यक्तींची होम क्वारंटाइनची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये आणण्यात आले आहे. आता तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ८० इतकी झाली असून त्यापैकी ६० व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित १६ रुग्णांपैकी १४ बाधितांवर कृष्णा हाॅस्पीटल, कराड व दोघांवर सिव्हिल हाॅस्पीटल, सातारा येथे उपचार सुरू आहेत. यापुर्वीच्या प्रलंबित ४७ स्वॅब नमुने अहवालापैकी ४० निगेटिव्ह तर ७ पाॅझिटीव्ह आले आहेत. सोमवारी नव्याने २४ व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत त्यांचे अहवाल मंगळवारी रात्री येण्याच्या शक्यता वर्तविण्यात आल्या आहेत
गेल्या दोन दिवसांपासून पाटण शहरात व कोयना परिसरात कोरोना बाबतच्या अफवांचे पिक आले आहे. शहरात व अन्य ठिकाणी रुग्ण सापडल्याचा दावा केला जात आहे. याबाबत जनतेच्या मनात घबराट पसरवली जात आहे. अनेक पत्रकार, शासकीय काम करणाऱ्या लोकांना लोकांचे फोन येत आहेत. तसेच काही जण व्हाट्सएपला रुग्ण सापडल्याचे चुकीचे स्टेटस ठेवून चुकीची माहिती पसरवत आहेत. तर काही जण रुग्ण सापडल्याचे छातीठोकपणे दावे करत आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अफवा पसरवून घबराट निर्माण करणारांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होते आहे.