पाटण:- दुसऱ्या लाटेचा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी २५ मे ते १ जून अखेर लागू केलेल्या १०० टक्के लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पाटण शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला असून या लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी व्यापारी, व्यवसायिक, नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य केले. या पाच दिवसाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत पाटणने शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर नाकाबंदी केली आहे. तर मेनरोडवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून विनाकारण फिरणाऱ्यांच्यावर कडक कारवाई देखील केली जात आहे. या लॉकडाऊन काळात कोरोनाला हद्दपार करण्यासाठी विनाकारण कोणीही बाहेर पडू नये असे आहवान प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, पो.नि. एन.इर.चौंखडे यांनी केले आहे.
कोरोना संघर्ष रोखण्यासाठी पंचवीस मे ते एक जून पर्यंत कडक लॉकडाऊनचा आदेश जिल्हाधिकारी सातारा यांनी दिला आहे. सोमवार रात्री बारा वाजल्यापासून लॉकडाऊन आरंभ झाला असून त्या अनुषंगाने प्रशासनाकडून पाटण शहरासह पाटण तालुक्यातील वार्ड समिती, गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती अलर्ट केले आहेत. समितीच्या मार्फत नागरिकांना माहिती देण्यात आलेली असून संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पाटण शहरात सकाळी सात वाजल्यापासून सर्वच रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. हौस्पिटल, मेडिकल दुकाने सोडलीतर सर्व दुकाने बंद होती. जुना बस स्थानक नवीन बस स्थानक या परिसरामध्ये शुकशुकाट जाणवत होता. शहरातील मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई पूर्णतः बंद होती. शहरातील सर्व रस्त्यावर बॅरिकेट लावल्याने पूर्ण शुकशुकाट जाणवत होता. या बंद काळात ग्रामीण भागातून पाटण शहरात कोणीही फिरकलं नाही. शहराच्या पुर्व – पश्चिम प्रवेशद्वारावर पोलिस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त असल्याने पाटण शहरात कोणालाही शहानिशा केल्याशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. तर पाटण तालुक्यातील कोयना, मोरगिरी, केरळ, मल्हारपेठ, नवारस्ता, तारळे, चाफळ, ढेबेवाडी या विभागात देखील या लॉकडाऊनची कडक अमलबजावणी करण्यात आली आहे.