सातारा :- कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरु नये म्हणून गर्दी व संपर्क टाळणे हे खूप महत्वाचे आहे. त्यासाठीच लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, सातारकरांची डोकी ठिकाणावर येत नसल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सकाळी व संध्याकाळी थोडी सवलत दिली पण सकाळी 8 ते 11 या सवलतीच्या वेळेत सातारकरांचा बाशिस्तपणा रस्त्यावर आलाच. शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्याची वेळ पोलिसांवरच आणलीच जातेय. सातारकर आताच सुधरा अन्यथा ऑरेंज झोनमधून रेड झोनमध्ये गेलात तर वाचवायला देवसुध्दा येणार नाही. दिवसभर भर उन्हात मात्र रस्ते होतातहेत सुनसान यामुळे सातारकरांची तऱहाच न्यारी असे म्हणावे लागत असले तरी अशीच बेशिस्त अंगलट येईल याचे भान ठेवण्याची गरज आहे.कोरोनाचे सात रुग्ण आढळल्यानंतर सध्या सातारा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. सावरण्याची संधी आहे. जिंकण्याची आशा आहे. प्रशासन त्यासाठी कठोर प्रयत्न करत आहे. अपुऱया साधनसुविधांसह कोणत्याही तक्रारीविना आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी जीवापाड मेहनत घेत आहेत. मुंबईकरांच्या बेशिस्तपणाला लगाम बसलाय पण ग्रामीण भागात सामाजिक अंतर राखण्याच्या नावाने बोंब आहे. मुंबईमधून संसर्गित होवून आलेले रुग्ण आढळल्यानंतर प्रत्येक गाव सतर्क झाले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग उन्हातान्हात मुंबईकरांसह अनुमानितांचा सर्व्हे करत आहे. बाधित रुग्णांच्या सहवासात आलेल्यांची तपासणी केली जात आहे. त्यातील बहुतेक रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. दर दिवशी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हायसे वाटत असले तरी कडक लॉकडाऊन पाळल्याशिवाय कोरोनाची संपर्क साखळी तुटणार नाही हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. सातारकरांकडून हेच सत्य नाकारले जात असून त्यामुळे सकाळी व संध्याकाळी सातारकर खरेदीसाठी व काहीतरी कारणे काढून बाहेर पडतच आहेत.
फिरायला येणाऱयांवर गुन्हे दाखल
सकाळी व सायंकाळी काही दिवस फिरले नाही तर जणू काही प्रचंड मोठे नुकनाच होणार असल्यागत काही निष्काळजी सातारकर त्यात महिला देखील आहेत त्या बाहेर फिरायला बाहेर पडतात. शेवटी पोलिसांनी अशा फिरस्त्यांवर गुन्हे दाखल केले. पोलीस ठाण्याला आणून देखील या निर्लज्य लोकांना त्याचे काहीच वाटत नव्हते. एकीकडे 90 टक्के जनता प्रामाणिकपणे संचारबदी पाळत आहे तर 10 टक्के सातारकरांना आता गुन्हे दाखल करण्याबरोबरच दांडक्यांचा प्रसाद देण्याची गरज आहे. फिरायला येणारे सभ्य नागरिक म्हणून पोलीस त्यांना सूट देतात तर एखादा गोरगरिब सापडला त्याच्या पार्श्वभागावर रट्टे देतात असे नको रट्टे देताना सामान्य न्याय हीच नागरिकांची मागणी आहे.
भाज्या खाण्याचे फारच वेड
कोरोनाची स्थिती गंभीर होतेय याची काळजी सर्वांनाच आहे. प्रशासन या परिस्थितीतून सर्वांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. नशिबाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सारखा अनुभवी अधिकारी लाभला आहे तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिजाऊंची लेक एसपी तेजस्वी सातपुते अहोरात्र पराकाष्ठा करत आहेत. मात्र, सातारकरांचे भाज्या खाण्याचे वेड फारच वाढले आहे. आता भाज्या घरापोहोच मिळत असल्या तरी उगीचच राजवाडा परिसर, खालचा रस्ता, वरचा रस्ता येथे होणारी गर्दी मुर्खपणाचा कळस असून तो मुर्खपणा बंद करा व स्वतःसह सर्व सातारकरांची काळजी घ्या.
दुचाकी गाडय़ा केल्या जप्त
सकाळी दिलेल्या सवलतीच्या वेळेत एवढी गर्दी वाढली की सातारकर कोरोनाविरुध्द लढायला एकत्र येवू लागलेत की काय असे वाटले. मात्र, कोरोना यामुळे हरणार नाही तर तो सातारकरांना हरवणार आहे याची जाणीव पोलीस दलाला असल्यामुळे शेवटी दुचाकीबहाद्दरांवर कारवाईचे अस्त्र उपसावे लागले आणि मग पोलिसांनी दुचाक्या जप्त केल्या. पोलिसांनी दुचाकीबरोबरच चारचाक्यांना फटके मारले पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जे नागरिक प्रामाणिकपणे लॉकडाऊनचे नियम पाळत आहेत त्यांना प्रशासनाने धन्यवाद व्यक्त केले आहेत.