औंध : औंध येथील मूळपीठ डोंगरावर फिरावयास आलेल्या प्रेमी युगुलास मारहाण करून त्यांच्या कडून रोख अडीच हजार रुपये व बावीस हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण पंचवीस हजाराचा ऐवज लुटल्याप्रकरणी औंध पोलीसांनी लुटमारीचा छडा लावून मुख्य सूत्रधार बाळू गिरिजाप्पा जाधव याच्यासह अन्य दोघांना अटक केल्याने औंध परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अशी माहिती औंध पोलीसांनी दिली.
याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, एक प्रेमी युगल मूळपीठ डोंगरावर फिरण्यासाठी आले होते. यावेळी ते एक अज्ञात ठिकाणी बसले असताना बाळू गिरिजाप्पा जाधव वय चौतीस,विशाल अशोक मदने वय पंचवीस रा.महिमानगड ता.माण व विशाल कैलास पाटोळे वय बावीस रा.औंध हे त्याठिकाणी गेले व सुरूवातीला त्यांनी प्रेमी युगुलास दांडक्याने मारहाण करून त्यांच्याकडून रोख अडीच हजार रुपये व बावीस हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण सुमारे पंचवीस हजार रुपयांचा ऐवज लंपास करून तिघे ही तेथून पसार झाले. त्यानंतर हे प्रेमी युगल औंध पोलीस स्टेशनमध्ये आले व घडलेली घटना सांगितली.त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्या कडे असणार्या संशयित आरोपींचे फोटो दाखविले .त्यातील एकाची ओळख पटल्यानंतर पोलीसांनी अवघ्या काही तासात मूळ सूत्रधार बाळू गिरिजाप्पा जाधव याच्यासह विशाल अशोक मदने व विशाल कैलास पाटोळे यांना पकडले आहे.
बाळू जाधव याच्यावर लुटमारीचे व अन्य गु्न्हे माण व कोरेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती पोलीसांनी दिली तसेच याअगोदर ही मूळपीठ डोंगरावर एकास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र याबाबत औंध पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झालेली नाही.
दरम्यान या अनपेक्षित घटनेमुळे औंध येथील मूळपीठ डोंगरावर येणार्या भाविक, पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. अधिक तपास सपोनि सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले,पोलीस हेड काँन्टेबल टी.ए.रसाळ, प्रशांत पाटील किरण जाधव, कुलदीप कटरे, सजगणे आदी करीत आहेत.
औंध पोलीसांचे आवाहन -:
याअगोदर औंध येथे येणार्या कोणाची
अशाप्रकारे मारहाण व लुटमार झाली असेल तर त्या व्यक्तींनी पुढे येऊन औंध पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करावी .फिर्यादीचे नाव गुप्त ठेवले जाईल तरी कोणतीही भिती नबाळगता तक्रारदारांनी पुढे यावे असे आवाहन सपोनि सुनील जाधव यांनी केले आहे.