पाटण:- सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी वनकुसवडे पठारावरील काठी, ता. पाटण येथील युवक नितीश पांडुरंग पवार या युवकावर पाटण पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वनकुसवडे पठारावरील काठी येथील नितीश पवार या युवकाने संबंधित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध जून ते ऑक्टोबर २०१७ या दरम्यान स्वतःच्या बहिणीच्या वनकुसवडे ता. पाटण येथील घरात कोणी नसताना त्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती मुलगी गरोदर राहिली आणि २५ जुलैच्या रात्री त्या अल्पवयीन मुलीने एका नवजात बालिकेला जन्म दिला. आणि त्या बालिकेला नातेवाईकांच्या संमतीने मारण्याच्या उद्देशाने रामापूर – पाटण येथील सांळुखे हायस्कूल जवळील झाडीत टाकून दिले. सकाळी तेथील स्थानिक नागरिकांना झाडीतून लहान मुलाचा रडण्याचा आवाज आल्याने. या नवजात बालिकेला नगरसेवक सचिन कुंभार, अनिल भोसले आदींनी तातडीने ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. व पाटण पोलिसांना कळविले. आता या नवजात बालिकेवर सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून या घटनेचा शोध सुरू असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. या मुलीकडे पोलिसांनी चौकशी केली असता. वनकुसवडे पठारावरील काठी येथील
नितीश पवार याच्या विरूद्ध संबंधित अल्पवयीन मुलीने पाटण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नितीश पवार याच्या विरूद्ध बलात्कार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकरणातील या लहानग्या नवजात बालिकेला मारण्याच्या उद्देशाने ज्याने झाडीत टाकून दिले. आणि त्यांना साथ करणारे इतर नातेवाईक यांच्यावर देखील पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि. उत्तमराव भापकर करत आहेत.