सातारा : मुंबई ते गोवा जाण्यासाठी इनोव्हा क्रीस्टा भाड्याने घेवून निघालेल्या दोन अनोळखी इसमांनी सातारा येथील पुणे-बेंगलोर महामार्गावरील हॉटेल सयाजी येथे रात्री मुक्कामासाठी थांबले होते. त्या इसमांनी चालकाची नजर चुकवून सुमारे 18 लाखाची इनोव्हा क्रीस्टा गाडी चोरून 23 च्या रात्री पलायन केले. दरम्यान 24 रोजी सातार्यात मुख्यमंत्र्यासह मंत्रीगण उपस्थित असतानाही सातारा पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पाटील यांनी इनोव्हा क्रीस्टा घेवून पळालेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली. अवघ्या 24 तासाच्या आतच सातारा शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या पथकाने कर्नाटकातील इनव्हर्सल पोलीस ठाणे पोलीसांच्या मदतीने सय्यद अब्दुल महम्मद खाजा साजीद (रा. मेहबुबनगर कॉलनी गुलबर्गा कर्नाटक) याच्या मुसक्या आवळून गजाआड केले आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी मोहन महादेव पवार(रा. विरार, मनवेलपाडा, ता. वसई, जि. पालघर) हे मिळेल त्या वाहनावर बदली चालक म्हणून काम करत असतात. सौ. सिमा जितेंद्र अंबवणे रा. दुसरी खत्तर गल्ली सीबीटँक रोड मुंबई) यांच्या मालकीच्या इनोव्हा क्रीस्टा क्रं. एम. एच. 01 सी. आर. 5859 ही गाडी गोव्याला जाण्यासाठी दोन इसमांनी भाड्याने घेतली. त्या गाडीवर मोहन पवार हे बदली चालक गेले होते. मुंबई गोवा महामार्गाने गोव्याला निघाले होते. माणगाव जि. रायगड गावच्या हद्दीत गाडी आल्यानंतर त्या दोन इसमांनी आम्हाला कोल्हापूर मार्गे गोव्याला जायचे आहे. तुम्ही गाडी महाबळेश्वर, पाचगणी मार्गे सातारला घेवून चला असे चालक पवार यांना सांगितले. इनोव्हा कार सातारजवळ आल्यानंतर त्या दोन इसमांनी आज रात्रीचा मुक्काम सातार्यात करू असे सांगीतले. महामार्गावरील वाढे फाटा जवळ असलेल्या सयाजी हॉटेलमध्ये दोन इसमांनी रूम भाड्याने घेतली. त्या इसमांनी चालकाकडून इनोव्हा कारची चावी काढून घेतली. आणि नजर चुकवून रात्री 11.30 च्यावेळी हॉटेल सयाजी पार्किंगमध्ये पार्क केलेली इनोव्हा क्रिस्टा गाडी घेवून पसार झाले. इनोव्हा कार चोरीस गेल्याचे लक्षात येताचा चालकाने गाडी मालकांना फोन वरून माहिती दिली. त्यानंतर इनोव्हा क्रिस्टा गाडी चोरीस गेल्याची फिर्याद चालक मोहन पवार यांने शाहुपूरी पोलीस ठाण्यात दाखल केली.
खा. उदयनजराजेंचा वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी दि. 24 रोजी सातार्यात मुख्यमंत्री व मंत्री होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी अधिकार्यांसह पोलीसांचा फौजफाटा कामाला लागला होता. या सर्व धावपळीतून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधिक्षक संदिप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी धरणे यांच्या सुचनांनुसार चोरीस गेलेल्या गाडीच्या शोधासाठी पथके रवाना झाली. इनोव्हा क्रिस्टा गाडीला जीपीएस सिस्टीम अद्यावत असल्याने स. पो. नि. किर्दत, पो. उपनिरीक्षक कदम, पो. कॉ. कुंभार यांनी जीपीएस सिस्टीम व संगणक कक्षाच्या सहाय्याने संपर्कात राहुन गाडीचे लोकेशन घेतले. मिळणार्या लोकेशननुसार गाडी महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यातील गुलबर्गा परीसरात असल्याचे लोकेशनवरून दिसून आले. लोकेशन नुसार सातारा गाडीचा पाठलांग करीत कर्नाटक राज्यात गेले. कर्नाटक राज्यातील पोलीस ठाण्यांना संपर्क साधून इनोव्हा गाडीच्या चोरीची माहिती दिली. मात्र कार सापडू शकली नाही. जीपीएसव्दारे मिळालेल्या लोकेशननुसार शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पथक व इनव्हर्सल पोलीस ठाणे कर्नाटक यांनी सयुक्त कारवाई करीत कुलबर्गी येथे इनोव्हा क्रिस्आ कार चालवित असताना सय्यद अब्दुल महम्मद खाजा साजीद (रा. मेहबुबनगर कॉलनी गुलबर्गा कर्नाटक) याच्या मुसक्या आवळून गजाआड केले आहे.