वडूज : खटाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करणार्या त्या चार नराधम आरोपींना वडूज येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दि. 18 तारखेपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कातरखटाव परीसरातील एका खेडेगावात 31 डिसेंबर रोजी पीडित मुलगी दुपारी घरी असताना दोन नराधमांनी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग केला होता. त्यांनतर दि. 1 रोजी एक जणाने येऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि घरातून बाहेर गेला. लगेच त्याचा मित्र घरात येऊन पुन्हा जबरदस्तीने अतिप्रसंग केला यावेळी पीडित मुलगी रडत असताना पुन्हा एकदा एकाने अतिप्रसंग केला. पुन्हा सर्व जण घरात एकत्र येऊन झालेला प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्या आई वडिलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली होती. मात्र अतित्रास होवू लागल्याने पिडीत मुलीने सदरची घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर सदर मुलीचे आई-वडील व माण तालुक्यातील काही नातेवाईकांनी वडूज पोलीस ठाण्यात येवून गावातील नागेश गोरवे, चंद्रकांत खरात, लखन काळे, योगेश लोहार या अल्पवयीन युवकांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी पाच वाजेपर्यंत फिर्याद देण्याचे काम चालू होते. त्यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठा जमाव जमला. या जमावाने आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस सदर युवकांना घेवून पोलीस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर जमावातील युवकांनी त्या नराधमांची यथेच्छ धुलाई केली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वडूज पोलीसांनी वरिष्ठांना कल्पना दिल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक धरणे हे वडूजला दाखल झाले होते. संशयित आरोपी अल्पवयीन असल्यामुळे नेमके काय करावयाचे? याबाबत पोलीसांचा बराच वेळ खल सुरु होता. त्यामुळे वडूज, कातरखटाव, निमसोड, बनपुरी, सुर्याचीवाडी या भागात तणावपूर्ण वातावरणात घटनेची चर्चा होती.
त्या पार्श्वभूमीवर चारही संशयितांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी केलेला प्रभावी युक्तीवाद व घटनेचे गांभीर्य ओळखून न्या. आर. के. मलाबादे यांनी त्यांना दि. 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.