वाई : शहरात मध्यरात्रीच्या सुमारास मध्यवस्तीत घराबाहेर रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांची अज्ञात व्यक्तीनी मोडतोड केल्याची घटना आज (मंगळवारी) उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरात मध्यवस्तीत मध्यरात्रीच्या रविवार पेठ, रामडोह आळी व ब्राम्हणशाही या भागात घराबाहेर रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.वाहनांची मोडतोड करण्यात आली.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार नेमका कोणी केला आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शहरात प्रथमच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे बारा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पोलिस सी.सी. कॅमेराच्या फूटेजच्या माध्यमातून अज्ञाताचा तपास सुरू केला आहे. शहरात विविध रस्त्यावर रात्री नागरिकांची वाहने घरासमोर लावलेली असतात. रविवार पेठ,
रामडोह आळी व ब्राम्हणशाही या भागात वाहनाच्या काचा फुटल्याचे सकाळी स्थानिक
नागरिकांच्या लक्षात आले .त्यामुळे नेमका कोणी हा प्रकार केला असावा, या परिसरात सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलीस करत आहेत. शहरात यापूर्वी कधीही अशा प्रकारची घटना घडली नव्हती. दरम्यान एखाद्या माथेफिरूने अथवा दारूच्या नशेत एखाद्या मद्यपिने हे कृत्य केले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे अधिक तपास करीत आहेत.