पाटण : तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील सुपूगडेवाडी येथील राखीव वनक्षेत्रात गुरुवारी (दि. १९) रात्री ११.३० च्या सुमारास विजेरीच्या सहाय्याने सशांची शिकार करणाऱ्या २ जणांना मुद्देमालसह रंगेहाथ पकडल्याने विभागातील जनतेतून पाटणचे वनाधिकारी विलासराव काळे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे.
याबाबत वनाधिकारी काळे यांनी दिलेली माहिती अशी, सुपूगडेवाडी येथील राखीव वनक्षेत्रात गुरुवारी (दि. १९) रात्री ११.३० च्या सुमारास विजेरीच्या सहाय्याने सशांची शिकार करणारे आरोपी शिवाजी रामकृष्ण पाटील (वय ४०) व रमेश मारुती पाटील (वय ३५), दोघे रा. कुठरे, ता. पाटण यांना वनपाल सुभाष राऊत, अमृत पन्हाळे, वनरक्षक विशाल डुबल, जयवंत बेंद्रे व वनमजुरांच्या टीमने प्रत्यक्ष जागेवर सशाच्या शिकारीसह, इलेक्ट्रिक यंत्र ( किरकिरे), २ हेड लाईट, बांबू काठी, छत्रीसह रंगेहाथ पकडले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४४, ४८ अ, ५१ अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.