सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये मोटार सायकली चोरीचे प्रमाण वाढले असताना पोलीस अधिक्षक पंकज देशमुख व अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखा सातारा येथील विशेष पथकाने माण तालुक्यातील म्हसवड येथे गस्त घालत असताना मोटार सायकली चोरणार्या टोळीतील दोघांना रंगेहाथ पकडले. उर्वरीत तीन जण फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पाच गाड्या जप्त केल्या आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखा साताराचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे हे त्यांच्या पथकासह म्हसवड, ता. माण येथील बसस्थानिक परिसरात शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना दोन इसम विना क्रमांकाच्या मोटार सायकलवर फिरताना आढळले. दरम्यान, संशयीत अमोल दिलीप लोेखंडे (वय 24, रा. मल्हारनगर म्हसवड, ता. माण व त्याचा साथीदार ज्ञानेश्वर उर्फ गुंड्या तुपे रा. मल्हारनगर म्हसवड यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी म्हसवड, माळशिरस, पिलीव, सोनहिरा साखर कारखाना येथून एकूण पाच मोटार सायकली सुमारे 2 लाखाच्या चोरल्याची कबूली दिली आहे. संशयीत ज्ञानेश्वर उर्फ गुंड्या तुपेसह तीन जण फरारी आहेत. अमोल लोखंडे व अन्य एकास अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी जप्त केल्या आहेत.
या कारवाईत स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, स. फौ. पृथ्वीराज घोरपडे, पो. हवा. विलास मागे, संजय पवार, ज्योतीराम बर्गे, पो. ना. मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, रुपेश कारंडे, वैभव सावंत, मयूर देशमुख, चा. पो. ना. गणेश कचरे, मारुती अडागळे यांनी सहभाग घेतला होता.
(छायाचित्र : संजय कारंडे)