सातारा : सातारा येथे दि. 27 मार्च रोजी होणार्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू सहभागी होणार असून या स्पर्धेला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी हॉटेल श्रीमान येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
यावेळी अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू विजय जाधव, अमर सायकल मार्टचे आशिष जेजुरीकर, अविनाश कदम, भालचंद्र निकम यांच्यासह अमॅच्युअर सायकलींग असोसिएशनचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
सायकल फेडरेशन ऑफ इंडिया, सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने व अमॅच्युअर सायकलींग असोसिएशन सातारा आणि आमदार शिवेंद्रराजे मित्रसमूहाच्यावतीने आयोजित या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना आमदार शिवेंद्रसिंह म्हणाले, सातारा शहरात होत असलेल्या हिल मॅरेथॉन स्पर्धेसारखाच या स्पर्धेचा प्रसार व्हावा, तसेच नवीन सायकलपटू तयार व्हावेत या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 27 तारखेला सकाळी 6 वाजता शाहू स्टेडियम येथून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून सातारा मेढा मार्गे महाबळेश्वर, महाबळेश्वरमार्गे पाचगणी मार्गे वाई व पाचवड ते सातारा असा या स्पर्धेचा मार्ग आहे. 18 ते 35 वयोगटातील फक्त पुरुषांसाठी असलेल्या या स्पर्धेसाठी सातारा जिल्हासह देशभरातून नामवंत राज्य संघटनांबरोबरच रेल्वे, सेनादल आदि दर्जेदार क्रीडा मंडळांच्या नावाजलेल्या सुमारे 250 सायकलपटूंचा सहभाग आहे. या स्पर्धेतील खेळाडूंना एकूण 6 लाख 66 हजाराची बक्षिसे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष अविनाश कदम म्हणाले, या स्पर्धेत मुंबई पुणे अशा होणार्या स्पर्धेच्या धर्तीवर केळघर घाट आणि पसरणी घाटात 5 किलोमीटर, 10 किलोमीटर अंतर जलद पार करणार्या सायकलपटूंना खास चषक देण्यात येणार असून त्यांना घाटाचा राजा किताबाबरोबरच रोख रक्कमही बक्षीस देण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील हौशी सायकलपटूंसाठी सातारा-मेढा ते पुन्हा सातारा अशी स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना चषक देण्यात येणार आहे तसेच सायकलींग स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा पूर्ण करणार्या सर्व स्पर्धकांमधून लकी ड्रॉ पद्धतीने तीन क्रमांक काढले जाणार असून त्यांना प्रत्येकी एक सायकल बक्षीस देण्यात येणार आहे.
अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू विजय जाधव म्हणाले, सातार्यात प्रथमच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय पंचाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मुंबई-पुणे सायकल रेसच्या सायकलपटूंना मिळणार्या रकमेपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस या स्पर्धेत देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी आशिष जेजुरीकर फायर फॉक्स स्टेशन, सायली हॉटेलसमोर पोवईनाका आणि हॉटेल श्रीमान येथे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी संयोजकांच्यावतीने करण्यात आले.