सातारा (अतुल देशपांडे यांजकडून) : श्री रामदास स्वामी संस्थान व श्री समर्थ सेवा मंडळ या दोन्ही संस्थांनी दासनवमी उत्सव समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पूनीत झालेल्या सज्जनगड येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. यावर्षीचा हा 337 वा दासनवमी उत्सव होता. श्री समर्थ सेवा मंडळ व रामदास स्वामी संस्थांनी यांनी या महोत्सवात दासबोध पारायण, प्रवचन, कीर्तन, संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते व संपुर्ण भारतातून नामवंत कलाकारांनी आपली कला समर्थ चरणी अर्पण केली.
यंदा राज्यातून दासनवमी उत्सव काळात लाखापेक्षा जास्त संख्येने भाविक गडावर 9 दिवस चालणार्या या उत्सवासाठी आले होते.समर्थ रामदास स्वामींच्या 337 व्या पुण्यतिथी निमित्त उस्मानाबाद जिल्हयातील तेर, मिरज येथून वेण्णास्वामी,समर्थं शिष्य कल्याण स्वामी यांची पालखी तसेच समर्थंाचे जन्मस्थळ असलेल्या जांब, करंडी ग्रामस्थ व अन्य ठिकाणाहून शेकडो समर्थ भक्तांसह पायी दिंड्या सज्जनगडावर आल्या होत्या.
दासनवमी उत्सवानिमित्त पहाटे दोन वाजता काकड आरती झाली यानंतर पहाटे 4 वाजता समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस रामदास स्वामींचे वंशज, अधिकारी व अध्यक्ष भूषण स्वामी व समर्थ भक्तांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर 6.30 ते 10 वाजेपर्यंत गडावर सांप्रदायिक भिक्षेचा कार्यक़्रम झाला. सकाळी 10 ते 11 यावेळेत पारंपारिक पोशाखातील मानकरी तसेच छत्र, चामर, दंड, आबदागिर्या,शिंग तुतार्यांच्या निनादात छबिना काढण्यात आला. 11.30 ते 12 या वेळेत समर्थ समाधी मंदिरास समर्थ वंशज तसेच अधिकारी स्वामी आणि पदाधिकारी तसेच हजारे समर्थं भक्तांनी 13 प्रदक्षिणा घालून समर्थाच्या नावाचा ..जयजय रघुवीर समर्थ..चा जयजयकार केला. दुपारी 12 ते 12.30 या वेळेत निर्वाण कथेचे वाचन समर्थ भक्त सुरेश बुवा सोन्ना रामदासी यांचेकडून करण्यात आले. रामायण वाचनानंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप असा कार्यक़्रम झाला. गडावर ठिकठिकाणी सुंदर रांगोळया काढण्यात आल्या होत्या.भाविकांनी रात्री पासूनच गडावर मोठी गर्दी केली असल्याने क्लोज सर्किट टिव्हीच्या माध्यमातून भाविकांना महापूजेचे दर्शन घडविण्यात येत होते. समर्थाचे शेजघरापुढे उभारलेले भव्य पुतळे विशेष आकर्षण ठरत होते.विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट यामुळे गडावर एक चैतन्यमय वातावरण दिसत होते. श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीनेचही सज्जनगडावर श्रीराम भक्त निवासात महाप्रसादाची सोय करण्यात आली होतीे. आज सकाळी गेला आठवडा भर चालेल्या सामुदायिक दासबोध वाचनाची सांगता नितीन बुवा रामदासी व रसिकाताई ताम्हणकर यांनी केली. या पारायण सोहळ्यात 120 हून अधिक समर्थ भक्त सहभागी झाले होते.सायंकाळी 4 पर्यर्त महाप्रसादाचे वितरण रांगा लावून केले जात होते.
दासनवमी निमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन विविध सामाजिक सेवा संस्थांचे स्वयंसेवक व अनिरूध्द बापू डिझॅस्टर मॅनेजमेंट ग्रुपचे 100 सदस्य गर्दी नियंत्रणासाठी पहाटे पासून झटत होते. गडावर येणार्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. टेलिफोन सुविधा व वीज वितरण कंपनीने कोणतेही भारनियमन न करता गडावर अखंड लाईट पुरविली होती. सज्जनगड येथे येणार्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने सातारा आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.
तर शहरातील राजवाडा बसस्थानकातून तसेच मध्यवर्ती बसस्थानकावरुनही दर 15 मिनीटाला गडावर जाणारी बस सोडण्यात येत होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक,75 पोलीस कर्मचारी व 2 बिनतारी संदेश यंत्रणेची वाहने तैनात करण्यात आली होती. आरोग्य विभागातर्ङ्गे आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती. समाधी मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रत्येक भक्ताची मेटल डिटेक्टर यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली होती. समाधी मंदिर व गडावर एकूण 12 ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेराद्वारे पहाणी करण्यात येत होती. पार्किंगची गैरसोय टाळण्यासाठी अर्ध्या घाटातच ज्ञानश्री कॉलेजजवळ वाहन तळ उभारला होता तेथुन भाविकांना एस.टी. बसमधून गडावर नेण्यात येत होते.
दासनवमी उत्सवाची सांगता उद्या 28 फेब्रुवारी रोजी लळीताच्या किर्तनाने होणार आहे. 9 दिवस चालणार्या या उत्सवात राज्यातून लाखो भाविक यावर्षी आले होते असे संस्थानचे अध्यक्ष भूषण स्वामी यांनी सांगितले.
सज्जनगड येथे दासनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
RELATED ARTICLES