सातारा, दि. 4 ः सातारा शहरातील अनेक विद्यार्थ्यांची जडणघडण करणारे व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी शालाप्रमुख आ. ब. तथा अण्णा कंग्राळकर यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन रविवार दि. 9 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते व पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरदराव कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
जिल्हा मद्यवर्ती बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशिय सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात अण्णा कंग्राळकर यांच्या नव्वदीनिमित्त त्यांचा गौरव करून कृतज्ञता व्यकत करण्यात येणार आहे. विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार व कंग्राळकर कुटुंबीयांचा स्नेह पूर्वीपासून आहे. पवार व कंग्राळकर कुटुंबीय एकमेकांचे नातेवाइक असून अजितदादा पवार यांनी या स्नेहबंधातूनच या प्रकाशन सोहळ्याला येण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच इतर विविध सामाजिक क्षेत्रांत अण्णा कंग्राळकर यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील अनेकांशी त्यांचे नाते जोडले गेले आहे. अशा सर्व स्नेहीजनांसह माजी विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. सुभाष दर्भे, गौरवग्रंथाचे संपादक अरूण गोडबोले, न्यू इंग्लििश स्कूलच्या शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी आणि कंग्राळकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर यांनी केले आहे. या कार्यक्रमात अण्णा कंग्राळकर यांच्याविषयीचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. या गौरवग्रंथात त्यांच्या अनेक माजी विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या लेखांचा समावेश आहे.