पाटण:– पत्रकार संरक्षण कायद्याचे जणक आणि महाराष्ट्रातील पत्रकारांचे आधारस्तंभ तथा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस. एम. देशमुख यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी पाटण तालुका पत्रकार संघाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आदी मंत्री यांना ईमेल व्दारे निवेदन पाठवून केली आहे.
पाटण तालुका पत्रकार संघाने पाठविलेल्या निवेदनात म्हणले आहे. महामहिम राज्यपालांकडून विधानपरिषदेवर १२ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यपालांनी आपल्या कोटयातून विचारवंत, साहित्यीक, कलावंत, पत्रकाराची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा असते. राज्यपालांनी ही अपेक्षा पूर्ण करतांना ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांच्या नावाचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती या निवेदनात केली आहे. या निवेदनात पूढे म्हटले आहे की, एस. एम. देशमुख हे मागील ३५ वर्षापासून पत्रकारीतेत सक्रीय आहेत. त्यांनी २३ वर्ष विविध वृत्तमानपत्रात यशस्वी संपादक म्हणून कार्य केले आहे. राज्यातील पत्रकारांचे प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. पत्रकारांना संघटीत केले आहे व राज्यात पत्रकारांची मोठी चळवळ उभी केली आहे. पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे. तसेच पत्रकारांना कायदेशिर संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी लढा उभारला. या लढयामुळेच शासनाला पत्रकारांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.
एस.एम.देशमुख हे लेखक म्हणूनही प्रसिध्द आहेत. त्यांची आठ पुस्तके प्रसिध्द झाले असून विविध दैनिकात पाच हजार लेख प्रसिध्द झाले आहेत. राज्यपालांनी आपल्या कोटयातून त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटना, जिल्हा संघ, तालुका संघाकडून होत असुन पाटण तालुका पत्रकार संघाने देखील महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आदी मंत्री यांना ईमेल व्दारे निवेदन पाठवून मागणी केली आहे
पाटण तालुका पत्रकार संघाच्या मागणीला पाठबळ..
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आपले आयुष्य पणाला लावणारे मा. एस.एम. देशमुख यांची विधानपरिषदेवर नियुक्ती व्हावी हि पाटण तालुका पत्रकार संघाची अनेक वर्षाची मागणी आहे. पाटण तालुका पत्रकार संघाचा २०१६ -१७ ला व त्यानंतर २४ जून २०१८ साली राज्यातील सर्व तालुका अध्यक्षांचा राज्यस्तरीय मेळावा पाटण येथे झाला. या मेळाव्याला सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जयंत पाटील, शंभुराज देसाई, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख, किरण नाईक, माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, सातारा जि. प. संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, शरद काटकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण ता. पत्रकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष शंकर मोहिते यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर एस.एम. देशमुख यांची नियुक्ती व्हावी अशी जाहीर मागणी केली होती. गत वर्षी वडवणी जि. बिड येथे राज्यस्तरीय झालेल्या कार्यक्रमात देखील हिच मागणी पाटण तालुका पत्रकार संघाने व्यासपीठावरुन केली. आज याच मागणीला बिड जिल्हा पत्रकार संघाने जिवीत स्वरूप आणून राज्यातील तमाम पत्रकारांच्या मागणीला पाठबळ दिले. याबद्दल बिड जिल्हा पत्रकार संघाचे आभार मानुन राज्यातील सर्व पत्रकार संघानी एस.एम.देशमुख यांच्या नियुक्ती साठी मागणी करावी असे आवाहन पाटण तालुका पत्रकार संघाने केले आहे.