कराड: भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा शाखेच्यावतीने कराड येथे रविवार, दि.24 डिसेंबर रोजी 18 वी भव्य धम्मपरिषद व दिक्षा समारंभ राष्ट्रीय अध्यक्षा मिराताई आंबडेकर आणि चैत्यभूमी मुंबई येथील भन्ते सुमेध बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडे यांनी दिली.
यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष वाय.के. काकडे, जिल्हा सरचिटणीस सुनील सपकाळ, कराड तालुकाध्यक्ष तानाजी बनसोडे, भीमराव गायकवाड, बी.जे.माने, यशवंत अडसुळे, रमेश थोरवडे, अशोक सोनवले, ए.व्ही. व्यवहारे, श्रीमंत घोरपडे, बी.डी. कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
रविवार, दि.24 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता कराड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिराताई आंबेडकर अभिवादन करणार असून तेथे समता सैनिक दलाच्यावतीने मान वंदना देण्यात येणार आहे. त्यानतंर डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगण, बुधवारपेठ येथे दुपारी 12 वाजता 18 वी धम्म परिषद, दीक्षा समारंभ व जाहीर सभा होणार आहे. भारतीय बौध्द महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिराताई आंबेडकर व चैत्यूभूमी मुंबई येथील पूज्य भन्ते सुमेध बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे माजी राष्ट्रीय सचिव व जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमात सचिव एन. एम. आगाणे, भिकाजी कांबळे, प्रभाकर जाधव, एस.एस. माने, वि.म. रुपवते, रुपेश तामगावकर, एस.पी. दिक्षीत, विजयराव गायकवाड, जितेंद्र कोलप यांचेही मार्गदर्शन होणार आहे. यावेळी सुदाम ढापरे, दिलीपराव थोरवडे, योगेश पाटणकर, अरुण गायकवाड, व्ही.एस. गायकवाड, प्राचार्य सुरेश खराते, प्राचार्य रमेश जाधव, बी.एन.कालेकर, डॉ.मीनाताई इंजे, राजेंद्रकुमार काकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी सातारा जिल्ह्यात श्रामणेर शिबीर, समता सैनिक दल शिबीर व महिला शिबीरे आयोजित केली होती. यात सहभागी झालेल्यांना यावेळी प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
सिध्दार्थनगर (जखिणवाडी) आगाशिवनगर कराड येथील बुध्दकालीन लेण्यांचे संरक्षण करावे व अतिक्रमणे हटवावीत, तसेच या ठिकाणास पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाल्याने या परिसराच्या विकासाची कामे तातडीने सुरु करावीत. लेण्याकडे जाण्यासाठी रस्ता करावा, भारतातील बुध्द कालीन लेण्यांचे संरक्षण व संवर्धन करावे, बौध्दांच्यासाठी स्वतंत्र बौध्द कायदा लागू करावा, अॅट्रासिटी कायद्यात बदल करु नये आदी मागण्यांबाबत धम्म परिषदेत चर्चा होणार आहे.
कराड-तासगाव रोडवर सुमारे 2 कोटी रुपयांचे भव्य आणि अत्याधुनिक महाविहार बांधण्यात येत आहे. कराड शहरालगत होत असलेल्या या महाविहारासाठी गोळेश्वरचे दानशूर कालकथित जगन्नाथ दादू झिमरे यांनी पाच गुंठे जागा विनामुल्य दान केली आहे. या जागेवर महाविहाराचे भूमिपुजन राष्ट्रीय अध्यक्षा मिराताई आंबेडकर यांनी 22 मे 2010 रोजी केले होते. तर 8 एप्रिल 2012 रोजी या महाविहाराच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता. या महाविहारामध्ये भव्य हॉल, उत्कृष्ठ ग्रंथालय, विपश्यना केंद्र, मुलांच्या शिक्षणांसाठी संगणक शिक्षण व्यवस्था, विवाह व इतर कार्यक्रमांसाठी सुसज्ज हॉल व समाजप्रबोधन केंद्र, पाली भाषेचे वर्ग, वधुवर सुचक केंद्र असे विविध सामाजिक व शैक्षणिक विकासाचे उपक्रम सुरु करण्यात येत आहेत. या महाविहाराचे काम समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने पुर्ण झाले असून अजून एक ते सव्वा कोटींचे कामांसाठीही अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे.
कराडात रविवार, दि. 24 डिसेंबर रोजी होत असलेल्या 18 वी धम्म परिषद व दीक्षा समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्ही.आर. थोरवडे यांनी केले आहे.