Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीडॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा ; पंढरपूर देवस्थानसाठी केलेल्या प्रयत्नांची शासनाकडून...

डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा ; पंढरपूर देवस्थानसाठी केलेल्या प्रयत्नांची शासनाकडून दखल ; कराडमध्ये आज जंगी स्वागत

कराड : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या संदर्भातील नोटीफिकेशनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 28) सायंकाळी सही केली असून, याबाबतचा शासन आदेशही नुकताच पारित झाला आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ असून, डॉ. अतुल भोसले यांनी अल्पावधीतच श्री विठ्ठल देवस्थानचा कायापालट करण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची दखल घेऊन, शासनाने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे.
गेल्यावर्षी आषाढी यात्रेच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणार्‍या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर डॉ. भोसले यांनी पंढरपूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे देवस्थान करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार जाहीर करत, मंदिराच्या विकासासाठी सातत्याने विविध महत्वाचे निर्णय घेत आपल्या कार्याची छाप राज्यभरात उमटवली. महाराष्ट्रासह कर्नाटक व आंधप्रदेशातून विठ्ठल दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांना सुलभरित्या दर्शन मिळावे यासाठी डॉ. भोसले यांनी येत्या आषाढीपासून तिरूपती व शिर्डीप्रमाणे टोकन पद्धत सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. संतसाहित्याचे संशोधन व्हावे आणि त्याचा प्रसार व्हावा, या उद्देशाने स्वतंत्र संत विद्यापीठ उभारण्यास डॉ. भोसले प्रयत्नशील असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकाराम महाराज संतपीठ नावाची संस्था स्थापन करण्यासाठी 15 नामवंत तज्ज्ञांची समिती नुकतीच गठीत केली आहे.
डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नामुळे मंदिर परिसराच्या विकासासाठी कॅनडा सरकारने सहकार्य करण्यास मान्यता दिली असून, याबाबत दोन्ही देशांच्या स्तरावर चर्चा सुरू आहे. डॉ. भोसले यांनी मंदिर परिसरासह प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागेचे वाळवंट स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊन, या कामासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पंढरपूर आता चकाचक दिसू लागले आहे. तब्बल 350 खोल्यांची क्षमता असणार्‍या सुसज्ज व देखण्या भक्तनिवास वास्तूचे काम डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, लवकरच ते भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पंढरपूर शहरात 5 ठिकाणी वॉटर एटीएम बसविण्याचेही नियोजन सुरू आहे. श्री क्षेत्र पंढरपूरचे पर्यटनदृष्ट्या महत्व वाढविण्याच्या दृष्टीने श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थानफ या नावाचे मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात चेजिंग रूम उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयही डॉ. अतुल भोसले यांनी घेतला. तसेच श्रींच्या चरणी अर्पण झालेले वेगवेगळ्या स्वरूपातील 24 किलो सोने आणि 800 किलो चांदी वितळवून त्यांच्या विठ्ठल चरणातील विटांच्या स्वरूपात वस्तू तयार करण्याचा महत्वाचा निर्णय डॉ. भोसले यांनी घेतला. याशिवाय भाविकांना लाडू प्रसाद, मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांना गणवेश असे अनेक महत्वाचे निर्णय घेऊन डॉ. अतुल भोसले यांनी अवघ्या 10 महिन्यांच्या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिसराचा कायापालट केला आहे.
डॉ. अतुल भोसले यांच्या या कार्याची दखल घेत आणि त्यांना मंदिराचा अधिकाधिक विकास करता यावा या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे. या पदामुळे डॉ. भोसले यांना शासकीय व राजकीय बळ प्राप्त झाले असून, त्याचा फायदा पंढरपूर देवस्थानसह कराड दक्षिण मतदारसंघातील गावांनाही होणार आहे.
कोट
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी असून, या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाचा सन्मान केला आहे. पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी येणार्‍या लाखो भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्याचा माझा प्रयत्न असून, वारकरी केंद्रबिंदू मानूनच मी यापुढेही कार्यरत राहणार आहे.
– नामदार डॉ. अतुल भोसले
कराडमध्ये आज जंगी स्वागत
राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यानंतर नामदार डॉ. अतुल भोसले यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन भारतीय जनता पार्टीच्या कराड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केले आहे. बुधवारी (ता. 30) दुपारी 3.30 वाजता तासवडे टोल नाका येते डॉ. भोसले यांचे आगमन होणार असून, तेथून मिरवणुकीने वहागाव फाटा, खोडशी, वारूंजी फाटा मार्गे कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर ते महात्मा गांधींच्या पुतळ्यास हार घालतील. त्यानंतर कराड शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली फिरून कराडकर मठात दर्शन व पुढे यशवंतराव चव्हाण यांनी समाधीस्थळावर अभिवादन व महापुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलच्या कॅम्पसमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून, ही रॅली मलकापूर, काले फाटा, आटके टप्पा, वाठार, रेठरे खुर्द मार्गे रेठरे बुद्रुक येथे पोहचेल. तेथे ग. स. पवार व्यासपीठावर सायंकाळी 7.30 वाजता ज्येष्ठ मार्गदर्शक मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular