साताराः सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, सहकाररत्न स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या 75 व्या जयंतीनिमीत्त श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर दि. 5 व दि. 6 मे रोजी सातारा फेस्टीव्हल 2019 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी दिली आहे. या सातारा महोत्सवात उच्च कोटीचे गायक, डान्सर आणि हरहुन्नरी विनोदी कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार असून सलग दोन दिवस गायन, नृत्य, कला आणि हास्याच्या खळखळाट होणार आहे. हा संपुर्ण कार्यक्रम सर्वांसाठी पुर्णपणे मोफत आणि खुला आहे. दि. 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता झी युवा वाहिनीवरील ख्यातनाम गायक आदर्श शिंदे यांचा बहुचर्चित युवोत्सव हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात आदर्श शिंदे यांच्यासह विशाल साजन आणि रामानंद हे आपल्या मधुर आवाजाने सातारकरांना मंत्रमुग्ध करणार आहेत तर, संस्कृती बालगुडे, पुजा सावंत, सई लोकुर, श्रृती मराठे, माधुरी पवार, किन्नरी दामा, रुतुजा राने हे आपला नृत्याविष्कार सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुर्णिमा ओक यांचे दिग्दर्शन असून प्रियदर्शन जाधव, कमलाकर सातपुते, योगेश सिरसाट आणि हेमांगी कवी हे विनोदवीर हास्याचे कारंजे फुलवणार आहेत. दि. 6 रोजी सायंकाळी 6 वाजता महोत्सवात झी मराठी वाहिनीवरील चला हवा येवू द्या धुमाकूळ घालणार आहे. या कार्यक्रमात चला हवा येवू द्या मधील निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश सिरसाट, श्रेया बुगडे आणि अंकुर वाढवे यांचा हास्यकल्लोळ पहावयास मिळणार आहे. या सातारा महोत्सवास झी मराठी वाहिनीवरील लागिरं झालं जी, तुझ्यात जीव रंगला, तुला पाहते रे, रात्रीस खेळ चाले आदी लोकप्रिय मालिकांमधील कलावंत उपस्थित राहणार आहेत. सातारकरांसाठी कला, सांस्कृतिक आणि अविस्मरणीय अशी विनोदाची मेजवाणी ठरणार्या या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
सातार्यात दि. 5 व 6 मे रोजी सातारा फेस्टीव्हलचे आयोजन
RELATED ARTICLES