भेकवली/महाबळेश्वर: महाबळेश्वर तालुक्यातील वारसोळी कोळी या गावात मागील पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा अभावी गावावर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा या ग्रामस्थांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले जात असून विजवितरणच्या या भोंगळ कारभारावर ग्रामस्थांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे, वाऱ्याचे प्रमाण देखील अधिक असते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असतो, काही काळासाठी खंडित झालेला विजपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू केला जातो. तापोळा विभागातील सर्वच ठिकाणी विजपुरवठा सुरळीत असताना फक्त एकमेव वारसोळी कोळी गावात विजपुरवठा मागील चार पाच दिवसांपासून बंद आहे. तांत्रिक अडचणी दूर करून विजपुरवठा पूर्ववत सुरू करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. परंतु, वीजवितरण कडून यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.
महाबळेश्वर तालुक्यातील वारसोळी कोळी या डोंगरावर वसलेल्या या दुर्गम आदिवासी पाड्यावर मागील चार पाच दिवसांपासून विज पुरवठा खंडित झाल्याने येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधने अतिशय अवघड झाले आहे. गावातील पिठाच्या गिरण्या बंद असल्यामुळे शेजारच्या गावातून दळण दळून आणावे लागत आहे. सरपटणारे, जंगली प्राण्यांचा धोका अधिक वाढला आहे. मुलांचे अभ्यासाचे नुकसान होत आहे. अशा अनेक समस्यांना ग्रामस्थ सामोरे जात आहेत तरी वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर तांत्रिक बिघाड दूर करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील वारसोळी कोळी या गावात पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित
RELATED ARTICLES