Friday, April 25, 2025
Homeठळक घडामोडीगणपतीसाठी पुण्याला एसटीची पंधरा मिनिटाला एक फेरी

गणपतीसाठी पुण्याला एसटीची पंधरा मिनिटाला एक फेरी

गणपतीसाठी पुण्याला एसटीची पंधरा मिनिटाला एक फेरी
सातारा : नोकरी-व्यावसाय, उच्च शिक्षणाच्या निमित्ताने घर, गाव सोडावे लागलेल्यांना एकत्र आणण्याचे काम गौरीगणपतीचा सण करतो. सणासाठी प्रत्येकाला सुखरुप गावी जाता यावे यासाठी एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने विशेष नियोजन केले आहे. पुण्याला दर पंधरा मिनिटाला एक फेरी सोडण्यात येणार आहे. नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने गाव सोडण्याशिवाय पर्याय नसतो. अशांना प्रत्येक सणाला गावाकडची आठवण येते पण जाणं शक्य नसतं. त्यामुळेच आपल्याकडे गौरी-गणपती अन् दिवाळीला सर्व भावंडं एकत्र येतात. साहजिकच या सणाची सर्वजण वाट पाहत असतात. सातारकरांना पुणे, मुंबईहून गावी येण्यासाठी एसटीशिवाय पर्यायच नसतो. हाच धागा पकडून राज्य परिवहन महामंडळाच्या सातार्‍याच्या विभाग नियंत्रण अमृता ताम्हणकर यांनी नियोजन केले आहे. गणेश स्थापना सोमवार, दि. 5 रोजी असणार आहे. त्यामुळे रविवारपासूनच लोक मुंबईहून निघू शकतात. याचा विचार करुन सातार्‍यातील गाड्या तीन तारखेलाच मुंबईला जाणार आहेत. रविवार आणि सोमवारी त्या पुन्हा येणार आहेत. त्याचप्रमाणे गौरी आगमन अन् विसर्जनच्या दिवशी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. अनंत चतुर्थीनंतरही गाड्यांच्या फेर्‍या वाढविण्यात येणार आहेत. मुंबईला जाणार्‍या गाड्या आगाऊ आरक्षणसाठी ऑनलाईन सोडल्या आहेत. या गाड्यांचे संगणकावर आरक्षण करता येणार आहे. या काळात सातार्‍यातून पुण्याला दररोज सुमारे पन्नास विनाथांबा गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्यास आवश्यकतेनुसार गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा वापर न करता राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांचा वापर करावा, असे आवाहन ताम्हणकर यांनी केले आहे.
मुंबई -चिपळूण एसटी सातारा मार्गे
कोकणवासीयांसाठी गौरी-गणपतीच्या सणाचे महत्त्व वेगळेच आहे. प्रत्येक कोकणवासी गणपतीसाठी मुंबईहून कोकणात जातात. त्यासाठी जादा गाड्या सोडल्या जातात. सातारा विभागानेही शंभर गाड्या मदतीला दिल्या आहेत. गेल्या महिन्यात महाड येथील सावित्रीनदीवरील पूल वाहून गेल्याने त्या मार्गावरील एसटी वाहतूक बंद केली आहे. मुंबईहून चिपळूणला जाणार्‍या सर्व एसटी गाड्या सातारा मार्गे जाणार आहेत. त्यामुळे या काळात वाहतुकीची कोंडी वाढण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी या सर्व गाड्या सातारा मार्गे असल्याने सातारकरांची गैरसोय काही अंशी कमी होण्यास मदतही होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात कराव्या लागणार्‍या एसटी बसची आरटीओ पासिंग यंदा ऑगस्टमध्येच करुन घेतले आहे. त्यामुळे गाड्या अडकून पडणार नाहीत. तसेच सर्व गाड्यातील गाड्यांची दुरुस्ती केली जात आहे. इंजिन कामांसाठी गाड्या विभागीय कार्यशाळेत मागविल्या आहेत. मुंबईतील चाकरमानी गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी सातारा विभागाने शंभर गाड्या मुंबई विभागाच्या ताब्यात दिल्या आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular