जनतेच्या मनातील विचारले प्रश्न;निवडणूक विभागाने केले शंका निरसन
सातारा : जिल्ह्यातील मतदारांना ईव्हिएम व्हिव्हिपॅटची ओळख व्हावी यासाठी प्रचार व प्रसिद्धीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला असून या कार्यक्रमांतर्गत सातार्यातील पत्रकारांना ईव्हिएम व्हिव्हिपॅटची ओळख व्हावी व त्यांचे शंकाचे निरसन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ईव्हिएम व्हिव्हिपॅट मशीनचे प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले.
या प्रात्यक्षिका वेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांनी ईव्हिएम व्हिव्हिपॅट मशीनची माहिती सांगितली.
जिल्ह्यातील मतदारांना ईव्हिएम व्हिव्हिपॅटची ओळख व्हावी व ते हाताळता यावे यासाठी जिल्ह्यातील 8 मतदार संघामध्ये कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत 406 ठिकाणी जिल्ह्यात हे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले आहे व 13 हजार 698 मतदारांनी यात सहभाग नोंदविला आहे. अजून 20 दिवस हे प्रात्यक्षिक सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी सांगितले. प्रात्यक्षिकावेळी मतदारांसमोर प्रात्यक्षिक करण्यात येत आहे. इव्हिएम व्हिव्हिपॅट बद्दल कुणी प्रश्न उपस्थित केले तर त्यांच्या प्रश्नांचे निरसन त्याचवेळी केले जात असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्व पत्रकारांनी मॉकपोल केले, त्या प्रात्यक्षिकात स्वतः जिल्हाधिकारी श्वेता सिंघल उपस्थित होत्या. मतदानापासून, व्हिव्हिपॅट मशीन मध्ये मतदान कोणाला केले याची खात्री करण्यापासून ते काउंटींग हे सगळे प्रात्यक्षिक यावेळी करुन दाखविण्यात आले.
सर्व राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रानिहाय एजंट लवकर नेमवावेत असे आवाहनही पूनम मेहता यांनी यावेळी केले आहे. तसेच जिल्ह्यात राजकीय पक्षानी निवडणुकीसाठी जाहिरात करताना जिल्हा माहिती अधिकार्यांकडून प्रमाणित करुन घेणे गरजेचे असल्याचेही मेहता यांनी यावेळी सांगितले.