सातारा दि : उत्तर कोरेगाव तालुक्यातील राजकीय दृष्टीने संवेदनशील असलेल्या सॊळशी मध्ये राजकीय आखाडा रंगला आहे.मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बदनामी होईल अशी पोष्ट सॊळशी येथील नंदगिरी महाराजांनी समाज माध्यमातून पाठवली.याबाबत वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की,सॊळशी येथील डोंगरावर पंचवीस वर्षांपूर्वी रुपचंद संगाप्पा गुंडगळे तथा नंदगिरी महाराज यांनी अथक परिश्रमातून स्वयंभू शनि देवस्थानाची पायाभरणी केली होती.याठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम व सामुदायिक विवाह सोहळा,अन्नदान असे विधायक उपक्रम राबविले जातात. त्याला जाहिरातबाजीने खूप मोठी प्रसिद्धी मिळाली असली तरी काही स्थानिक लोक दुखावले गेले आहेत. त्यातून राजकारण घडत असताना या पूर्वी नंदगिरी महाराज यांच्यावर महिलेशी वाद घातल्याची तक्रार झाली होती. ती समंजस्याने मिटविण्यात आली होती. तेव्हापासून धुसफूस सुरू होती.
शनिवारी रात्री ‘उत्तर कोरेगाव सुपुत्र ‘ या समाज माध्यम ग्रुपवर मुख्यमंत्री ठाकरे यांची बदनामी होईल अशी पोष्ट नंदगिरी महाराज यांनी टाकली.त्यामुळे सॊळशी येथील शिवसेना पदाधिकारी संतोष सोळस्कर यांनी व्हिडीओ क्लिप संदर्भ देऊन रविवारी दुपारी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. या तक्रारीची नोंद घेऊन भा.द.वि.कलम ५०० नुसार अ दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पो उप नि पाटील हे करीत आहेत.
सध्या कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लोक संचारबंदीचे सातारा जिल्ह्यात पालन करीत आहेत. अशा वेळी समाज माध्यमातून टीका -टिपणी करण्याचा उधोग वाढला आहे. यावर निर्बन्ध घालण्याची गरज सातारा जिल्हासह महाराष्ट्र राज्यात निर्माण झाली असून चुकीच्या किंवा टीका -टिपणी करणारी पोष्ट टाळली पाहिजे असे आवाहन अनेकदा करण्यात आले होते. आता गुन्हा दाखल झाल्याने राजकीय समर्थक पुढे आले असून पोलीस ठाण्यात प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे खात्रीपूर्वक वृत्त समजले आहे.
समाज माध्यमावर ठाकरे यांच्यावरील पोष्टबाबत सॊळशीच्या नंदगिरी महाराजांच्या विरोधी गुन्हा दाखल
RELATED ARTICLES