शिवनगर : सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयाने घेतलेल्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये गुलाबांचे विविध प्रकार, विविध फुलांची केलेली आकर्षक सजावट, औषधी वनस्पती व त्यांचे महत्व याबाबत माहिती देणारे हे प्रदर्शन पाहण्यास कराडसह परिसरातील हजारो पुष्पप्रेमींनी गर्दी केली होती.
कराड येथे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे आयोजित केलेल्या पुष्पप्रदर्शनाचे उदघाटन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते व कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, कृष्णा अभिमत विद्यापिठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, माजी व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील, संचालक धोंडिराम जाधव, जितेंद्र पाटील, सुजीत मोरे, गिरीश पाटील, अमोल गुरव, संजय पाटील, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, मनोज पाटील यांची उपस्थिती होती.
पुष्प प्रदर्शन स्पर्धेतील विजेत्यांना कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यामध्ये खुल्या वातावरणातील पुष्प उत्पादन, नियंत्रित वातावरणातील पुष्प उत्पादन व पुष्प रचना या तिन्ही विभागातील विजेतेपद जयसिंगपूरच्या संजय घोडवत ग्रुपने पटकावले. खुल्या वातावरणातील पुष्प उत्पादनात द्वितीय क्रमांक आबासाहेब भोसले सातारा, तृतीय क्रमांक सोमनाथ घाडगे सोलापूर, तर उत्तेजनार्थ सचिन देसाई कोल्हापूर यांनी पटकावले, नियंत्रित वातावरणातील पुष्प उत्पादन मध्ये द्वितीय क्रमांक सुहास पवार वडोली निळेश्वर , तृतीय क्रमांक उत्तमराव पाटील बहे, वाळवा, उत्तेजनार्थ सारिका पाटील राजमाची यांनी मिळवला. पुष्परचनेत द्वितीय क्रमांक प्रशांत गरुड येणके, तृतीय क्रमांक गुरुदेव मोरे कोरेगाव तर उत्तेजनार्थ उत्तमराव पाटील बहे यांनी मिळवला.या स्पर्धेत सातारा ,सांगली ,कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील संघ व शेतकरी सहभागी झाले होते. या प्रदर्शनाचे संयोजन प्राचार्य डॉ. भास्कराव जाधव, उपप्राचार्य नारायण किल्लेदार, प्रा.डॉ. अजित पवार, प्रा.डॉ.धनाजी माळी, प्रा.प्रियांका घाडगे, किरण शिंदे यांनी केले.
–शोभिवंत गुलाबपुष्प ते औषधी वनस्पती
या प्रदर्शनात पुष्पप्रेमींनी गुलाब फुलांच्या डच, शकिरा, ताजमहाल, औलांचं, नारंगा, ट्रॉपिकल, अमेझॉन, पॉयझन, बुनियार, रिव्हाव्हल, रॉयल क्लास या जाती तर जरबेरा फुलांच्या डामलिन व इमा या जातींसह ऑर्किड, शेवंती, कार्नेशिअन, पर्पल व्हाईट, जिप्सी, क्रॉस कॉर्न ही शोभिवंत फुले पहावयास मिळाली. याशिवाय अडुळसा, गुळवेळ, बेहडा, सफेदमुसळी, रानवांगे,तुळस, रिठा, गुगुुळ, सदाफुली, अश्वगंधा, ब्राम्ही, वाळा, अर्जुन, सर्पगंधा, बिब्बा,गवती चहा, कोरफड ,माईनमुळा,हिरडा, पुष्करमुळा, काटेसाबर,शतावरी,वाळा, पानफुटी या विविध औषधी वनस्पतींची माहिती सविस्तरपणे प्रदर्शनातून मिळाली.