सातारा- कास पठार, ठोसेघर आणि भांबावली धबधबा येथे वन विभागाची जागा आहे. पर्यटकांची सुरक्षा, सोयी सुविधा आणि पर्यटनस्थळांचा विकास या दृष्टीने वन खात्याच्या अखत्यारीत असणारी कामे वन विभागाने तातडीने मार्गी लावावीत. तसेच राज्य शासन पातळीवरून होणाऱ्या कामांसाठीचे प्रस्ताव तातडीने तयार करून ते शासनाकडे पाठवा, अशा सूचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
कास पठार, ठोसेघर धबधबा आणि भांबावली धबधबा या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या आणि सोयीच्या दृष्टीने प्रस्तावित कामे मार्गी लागावीत आणि पर्यटनस्थळांचा विकास व्हावा यादृष्टीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वन विभागाच्या कार्यालयात जाऊन उप वनसंरक्षक अदिती भारद्वाज यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, शंकरराव चव्हाण, विठठल कदम, जयराम चव्हाण, रविंद्र मोरे, सोमनाथ जाधव, दत्तात्रय किर्दत, रामचंद्र उंबरकर, प्रदीप कदम, दत्ताराम बादापुरे, ज्ञानेश्वर आखाडे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वन विभागाच्या हद्दीतील घाटाई देवी रस्ता, ठोसेघर- मालदेव, बोंडारवाडी रस्ता आदी रस्त्यांची कामे मार्गी लावणे. ठोसेघर येथील धबधब्याच्या परिसरातील पायऱ्या व गॅलरीची दुरुस्ती करणे. ठोसेघर येथे झुलता पूल तयार करण्याचा सर्व्हे झाला असून या कामाला मंजुरी मिळवणे. कास पठार विकास आराखडा तयार करण्यात आला असून याचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवणे. कास पठार परिसरात सेल्फी पॉईंट, माहिती व दिशादर्शक फलक लावणे, गॅलरी करणे, माहिती केंद्र उभारणे, कुमुदिनी तलावाकडे जाणारा रस्ता करणे, भांबावली धबधबा येथे बांबूची गॅलरी तयार करणे तसेच ती पर्यटकांच्यादृष्टीने सुरक्षित असावी याची काळजी घेणे. कास पठार आणि ठोसेघर येथे पार्किंग व्यवस्था करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
कास पठार व ठोसेघर धबधबा समितीने सुचवलेली कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. तसेच विकास आराखडा तयार करून त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, गॅलरी व झुलता पूल करण्यासाठी बांधकाम विभागाने सर्व्हे करावा, त्यासाठी आम्ही आर्किटेक्ट उपलब्ध करून देतो. याबाबत तातडीने कार्यवाही करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
पर्यटनवाढीच्या दृष्टीने वन खात्याच्या अखत्यारीत विकासकामे मार्गी लावा :- आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ; उप वनसंरक्षक अदिती भारद्वाज यांना केल्या सूचना
RELATED ARTICLES