सातारा ः लोकरंगमंचच्या माध्यमातून सातारचे हरहुन्नरी व्यक्तीमत्व असणार्या तुषार भद्रे यांनी आजपर्यंत हजारो सिनेनाटय क्षेत्रात कलाकार निर्माण केले. 1975 सालापासून तुषारची सुरू असलेली रंगकर्मी म्हणून धडपड मी जवळून पाहिली आहे. तुषारने नोकरी करतानाही त्यात न रमता अर्थाजर्नाकडेही लक्ष दिले नाही. मात्र सातारचे लाडके खा.उदयनराजेही ज्यांना गुरूजी असे संबोधतात अशा तुषार भद्रे गुरूजींची तुम्हा नवीन पिढीतील कलाकारांना मिळालेली पर्वणी व मार्गदर्शन खरोखरच बहुमोल आहे. या मिळालेल्या संधीचे आपण सोने करा व तुमची कला लोकांपर्यत आणत आज या रंगमंचावरून तुमचा प्रवास दिग्गज अभिनेते म्हणून होवो अशा शब्दांत दै. ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सातारा येथील एसबीएन साताराच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त सातार्यामध्ये तुषार भद्रे स्कूल ऑफ थिएटर अॅण्ड फिल्म आर्टच्या वतीने आर्ट फ्युझन फेस्टीव्हलच्या उदघाटन सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून बापूसाहेब जाधव बोलत होते.या महोत्सवाचे उदघाटन सातारा येथील दैनिक ग्रामोध्दारचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब जाधव,सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ नाटककार दिलीप जगताप आणि कला महाविद्यालयाचे प्राचार्य विजय धुमाळ यांचे हस्ते नटराज पुजन व दिपप्रज्वलनाने झाली. हा महोत्सव दि. 14 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान शाहू कला मंदिर सातारा येथे संपन्न होत आहे.
उदघाटन सोहळयाची सुरवात नटराजाला नमन करणार्या नांदीने झाली. यावेळी वैभव फडतरे यांनी आपल्या सहकलाकारासमवेत अतिशय सुरेख नांदी सादर केली यावेळी तबला साथ विक्रम फणसे व प्रविण गायकवाड यांनी केली. 82 वर्षीय उध्दव गुरव या ज्येष्ठ कलाकारांची शिंगवादन कलाही कार्यक्रमाची रंगत वाढविणारी होती.
या महोत्सवाविषयी बोलताना आपल्या प्रास्ताविकात तुषार भद्रे म्हणाले की, सातारचा सांस्कृतिक पर्यावरणाला समृद्ध करणार्या या महोत्सवात परफॉर्मिंग आर्ट व फाईन आर्टचा संगम करण्यात आलेला आहे.मागील वर्षी आपल्या चांगल्या प्रतिसादामुळे हा आगळावेगळा उपक्रम असून नाट्य-चित्र-शिल्प-साहित्य याचा एकत्रित असा आविष्कार सादर होत आहे. कलेला प्रोत्साहन मिळावे अधिकाअधिक रसिक प्रेक्षक वाढावेत व नवनवीन कलाकार निर्माण व्हावेत, कला लोकांपर्यंत पोहचावी हाच या उपक्रमाचा उद्देश आहे. आज जे उभरते कलाकार आहेत ते उद्या व्यावसायिक कलाकार बनतील याचे आपण साक्षीदार होवूयात. श्वासात श्वास असेंपर्यत मी रंगकर्मी म्हणून काम करतच राहणार आहे.
पत्रकार हरिष पाटणे यांनी तुषार भद्रे हे सिनेनाटय कलासृष्टीचे विद्यापीठच आहे. भद्रे यांचेमुळे सातारचे नाव संपूर्ण राज्यात आदराने घेतले जाते. नव्या कलाकारांना करिअर करण्यासाठी त्यांनी काही वर्षापुर्वी आपल्या घरात सुरू केलेली अॅकॅडमी मी जवळून पाहिली आहे. आज त्यांचे अनेक शिष्य दुरदर्शन मालिका, नाटक व चित्रपटाच्या माध्यमातून तयार होत काम करीत आहेत. हीच त्यांच्या कामाची पोहच पावती आहे. कलेची मुशाफीरी करणार्या विस्मयी कलाकाराला आपण भरभरून दाद दिलीच पाहिजे.
पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी तुषार भद्रे यांचे मार्गदर्शन घेवूनच अतुल कुलकर्णी सारखा दिग्गज अभिनेता उंची गाठू शकला. तुषार यांनी मुंबई गाठली असती तर तिथे केवळ वेगळे भद्रे घडले असते मात्र अनेक कलाकार घडविण्यासाठी तुषार भद्रे इथेच राहिले. याबद्दल आपण त्यांच्या ऋणात राहूयात व त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देवूयात अशा शब्दंात मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी उदघाटन सोहळयानंतर शीर्षकांच्या शोधात या आगळयावेगळया कार्यक्रमात अकादमीच्या प्रथमच स्टेजवर आलेल्या उमेदवार कलाकारांनी आगळावेगळा प्रयोग सादर केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमांगी जोशी यांनी केले. महोत्सवासाठी अतिशय सुरेख सजावट सागर गायकवाड यांनी केली असून शाहुकला मंदिराच्या प्रांगणात हुबेहुब खरे दिसणारी खुर्चीत वाट पाहणारी वासुदेवाची प्रतिकृती या महोत्सवासाठी येणार्या सर्वाचे आकर्षण ठरत आहे.
उदघाटन सोहळयानंतर गजर, नेकलेस व रेनमेकर या एकांकिका सादर झाल्या. तर मंगळवारी प्रा.दिलीप जगताप लिखीत गस्त हे दोन अंकी नाटक मुंबईच्या अभिनय कल्याण या संस्थेच्या 28 कलाकारांनी सादर केले. दुपारी 3 ते5 वेळेत अमित ढाणे, अमोल वाघमोडे, सोमनाथ गावठे, मंगेश शेवते या नामवंत चित्रकारांनी पोट्रेट, लॅन्डस्केप, कॅलीग्राफी यांची प्रात्यक्षिके सादर केली.
बुधवार दिनांक 16 जानेवारी रोजी. दुपारी 3 वाजता सातारचे संजय कुंभार, संदीप निकम, रवी कुंभारहे तीन शिल्पकलेची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. सायं. 7 वाजता अभिरुची कोल्हापूर निर्मित 2 अंकी नाटक कॅलिगुला हे सादर होणार आहे.
गुरुवार दि. 17 रोजी दुपारी 3 ते 5 यावेळेत रंगभूषाकार कुमार भुरके, व प्रशांत इंगवले हे रंगभूषा-वेशभूषा यांची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत आणि सायं. 7 वाजता हापूस क्रिएशन निर्मित लोककथा 78 हे रत्नाकर मतकरी लिखित संिंदप जंगम दिग्दर्शित दोन अंकी नाटकाचा प्रयोग संपन्न होणार आहे.
शुक्रवार दि. 18 रोजी महोत्सवात विश्रांतीचा दिवस असून शनिवार दिनांक 19 जानेवारी रोजी.सायंकाळी 7 वाजता एका धोतराची गोष्ट आणि रात्री 8.30वाजता आहे मनाहेर तरी.. हा पु. ल. देशपांडे यांचेवरील दिर्घांक वर्षा वैद्य सादर करणार आहेत.
रविवार दिनांक 20 जानेवारी रोजी.सायंकाळी 7 वाजता कोल्हापुर येथील परिवर्तन कला केंदाचे कलाकार र्हास पर्व हे 2 अंकी नाटक सादर करणार असुन त्यानंतर सातारचे ज्येष्ठ लेखक सिनेदिग्दर्शक पटकथाकार, नाटककार दिलीप आंबेकर यांना जीवनगौरव पुरस्कार तर सातारचे ज्येष्ठ रंगकर्मी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील पेशवे मोरोपंत पिंगळे ही भूमिका साकारणारे नंदू पाटील यांना सातारा नाटयगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या संपूर्ण महोत्सवासाठी नाममात्र 100 रूपये देणगी प्रवेशिका असून महोत्सवाला मोठा प्रतिसाद देवून सातारकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन तुषार भद्रे, सागर गायकवाड, प्राचार्य विजय धुमाळ यांनी केले आहे.
रंगमंचावर तुम्हाला मिळालेल्या संधीचे सोने करा :- बापूूसाहेब जाधव ; तुषार भद्रे स्कूल ऑफ थिएटर अॅण्ड फिल्म आर्टच्या वतीने आर्ट फ्युझन फेस्टीव्हल सुरु
RELATED ARTICLES