फलटण: मालोजीनगर (कोळकी) येथील कोळकी युथ फौंडेशनच्या गणेशोत्सव मंडळाने आधुनिकतेची कास धरत श्रीगणेशाची ऑनलाईन आरती केली आहे. विशेष म्हणजे या आरती करीता फक्त पुण्या-मुंबईतीलच नव्हे तर अमेरीकेतील भक्तांनीही उपस्थिती दर्शवली आहे.
कोळकी युथ फौंडेशनच्या गणेशोत्सव मंडळाने यावेळी ऑनलाईन आरतीची संकल्पना समोर आणली आहे. मंडळातील जे गणेश भक्त शिक्षणासाठी परगावी व परदेशात स्थायिक झालेले आहेत. अशा भक्तांनी टेक्नॉलॉजीचा आधार घेत व्हिडीओ कॉलींगद्वारे श्रीगणेशाच्या आरतीला उपस्थिती दर्शवलेली आहे.
विशेष म्हणजे परदेशातील व परगावचे काही सदस्य दररोज आरतीसाठी ऑनलाईन उपस्थित असतात. यात टेक्सास (अमेरीका) येथील प्रतिक मगर, आसाम येथील युको बँकेचे अधिकारी निलेश डफळ, मुंबई येथील खाजगी कंपनीच्या एच. आर. विभागात काम करणारे निलेश डफळ, पुणे येथील सी. ए. संकेत पोखरना, इंजिनीयर किशोर पंडीत यांच्यासह परगावातील व परदेशातील गणेशभक्तांचा सहभाग नित्यनियमाने दररोज आरतीसाठी सहभाग असतो.
फलटणचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणार्या कोळकीसारख्या ग्रामीण भागातील गणेशभक्तांनी राबविलेल्या या संकल्पनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या दिसत आहेत.