Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडी'घरोघरी तिरंगा अभियान' आता लोकचळवळ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; घरोघरी तिरंगा...

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; घरोघरी तिरंगा अभियान राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल ; घरोघरी तिरंगा अभियानाचा ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून राज्यस्तरीय शुभारंभ


मुंबई, दि. ९: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल. कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे आज घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी व अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांची यावेळी उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत १९४२ रोजी याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून चले जाव चा नारा देण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्या साथीचे हे आंदोलन अधिक व्यापक झाले. लाखो जणांनी आपले प्राण या देशासाठी अर्पण केले. या देशप्रेमाची, शहिदांच्या बलिदानाची आठवण आणि शहीद वीरांप्रती कृतज्ञता म्हणून आपण देशभरात आपल्या राष्ट्रध्वजाविषयी नव्या पिढीत आत्मीयता निर्माण करत आहोत. मागील दोन वर्षात राज्यात घरोघरी तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यावर्षीही राज्यातील अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जगवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार आहे. आपल्या राष्ट्र ध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. नव्या पिढीत हीच प्रेरणा आणि विश्वास निर्माण करण्याचे काम हे अभियान करणार आहे. अधिक उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करून राज्यभरात देशभक्तीचा मळा फुलणार आहे आणि देशप्रेमाचा सुगंध वाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभियानात गावागावात, शहरात
रॅली, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून हे अभियान साजरे करायचे आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात विकास आणि कल्याणकारी योजनाच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याचे काम राज्य शासन करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

आपल्या खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत विविध पदक मिळवून तिरंगा फडकवला, याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. आपल्या राज्याच्या स्वप्नील कुसाळे यांच्यासह नीरज चोप्रा, मनू भाकर, हॉकी संघाने पदक पटकावले. ही खरोखरच अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

प्रास्ताविकात अपर मुख्य सचिव श्री. खारगे म्हणाले की, देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबविले जात आहे. राज्यातही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे केले जात आहे. या अभियानात मागील दोन वर्षा प्रमाणेच आपले राज्य आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि इतर मान्यवरांनी हुतात्मा स्मृती स्तंभास अभिवादन केले.

कार्यक्रमानंतर पदयात्रा आणि सायक्लाथॉन यात्रेस यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तिरंगा कॅनव्हास वर स्वाक्षरी केली आणि त्याठिकाणी असलेल्या घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांना तिरंगा प्रतिज्ञा दिली.

या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0000

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular