कोरेगाव: कोरेगाव शहराचा एक भाग असलेल्या मात्र तांत्रिकदृष्ट्या नगरपंचायतीच्या स्थापनेमुळे गोळेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेलेल्या परिसराचा विकास कोरेगावच्या बरोबरीने साधणार आहे. त्यांना विकासकामांमध्ये निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
गोळेवाडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सौ. सुनंदा गौतम काकडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे व नगरसेवक महेश बर्गे यांची भेट घेतली. सौ. काकडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यावेळी बर्गे बोलत होते. गोळेवाडीचे माजी सरपंच सतीश गोळे, विद्यमान सदस्य गणेश गोळे, सुनिता घाडगे, सामाजिक कार्यकर्ते गौतम काकडे, अनिल बाबर, बापूसाहेब जाधव व नगरपंचायतीचे अधीक्षक अजित बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राजाभाऊ बर्गे पुढे म्हणाले, कोरेगाव ग्रामपंचायत असताना बागलकोट, कुमठेङ्गाटा, भवानीनगर, सदगुरुनगर हा शहराचा एक भाग होता. नगरपंचायतीची स्थापना करत असताना शासनाने तांत्रिक बाब म्हणून हा भाग शहरातून वगळला आणि तो गोळेवाडी ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ठ केला. शासनस्तरावर ही तांत्रिक बाब असली तरी या भागातील जनतेची नाळ कोरेगावबरोबर जोडली गेलेली आहे. त्यांना आज देखील आम्ही मूलभूत सुविधा पुरवत असून, नगरसेवक महेश बर्गे हे या परिसराचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या विभागाच्या विकासाची जबाबदारी उचललेली असून, त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. या परिसराचे योगदान कधीही विसरले जाणार नाही. त्यांना शहराचाच एक घटक म्हणून गणले जाईल आणि विकासकामांमध्ये निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही बर्गे यांनी स्पष्ट केले.
महेश बर्गे म्हणाले, त्रिशंकु परिसर तयार झाल्यानंतर हा परिसर नगरपंचायत हद्दीत समाविष्ठ व्हावा, म्हणून शासनस्तरावर खूप प्रयत्न केले. बागलकोट, कुमठेङ्गाटा, भवानीनगर, सदगुरुनगर परिसराचा सर्वागिण विकास साधण्याची जबाबदारी उचललेली असून, तीन्ही ग्रामपंचायत सदस्य एकजीवाने काम करतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सतीश गोळे व सुनंदा काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. बापूसाहेब जाधव यांनी आभार मानले. यावेळी राहूल काकडे, नरेश बर्गे, सतीश घाडगे, रुपेश गोळे, अक्षय पवार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.