Thursday, April 24, 2025
Homeसातारा जिल्हाकराडसुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराने होणार महाराष्ट्रातील मान्यवरांचा गौरव ; कराड...

सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराने होणार महाराष्ट्रातील मान्यवरांचा गौरव ; कराड येथे 15 जुलैला होणार ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांच्यासह अन्य चार पत्रकारांचा सन्मान : इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनचा उपक्रम

कराड, दि. 4 (प्रतिनिधी) ः  सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 168 व्या जयंती निमित्त इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनच्या वतीने गोपाळ गणेश आगरकर सुधारक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार 2024 हा कार्यक्रम सोमवार दि. 15 जुलै रोजी सकाळी 9 वाजता , सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय विद्यानगर कराड येथे आयोजित केला आहे.  या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांना राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवनगौरव या पुरस्काराने, तसेच मान्यवर पत्रकारांचाही राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील, टेंभू गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रुपाली युवराज भोईटे, उद्योजक रामकृष्ण वेताळ, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ज्येष्ठ संपादक मधुकर भावे (मुंबई) यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवनगौरव पुरस्कार, सचिन जवळकोटे (सोलापूर) दैनिक लोकमत सोलापूर, सोनाली शिंदे (पुणे) अँकर साम टी. व्हि. चॅनेल,  दीपक प्रभावळकर, आवृत्तीप्रमुख दै. तरुण भारत, सातारा, गजानन चेणगे  दै. सामना सातारा जिल्हा प्रतिनिधी यांना  सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
थोर समाजसुधारक, संपादक, शिक्षणतज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड तालुक्यातील टेंभू येथे 14 जुलै 1856 साली अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाज जागृतीच्या कार्यात आगरकरांचे अतुलनीय योगदान आहे. लो.टिळकांच्या केसरी वर्तमानपत्राचे संपादक म्हणून काम पाहिले. समाज सुधारणेबाबत आग्रही असणाऱ्या आगरकरांनी सुधारक वर्तमानपत्र सुरु केले. केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान-निष्ठा अशी सुधारणावादी भूमिका त्यांनी सातत्यपूर्ण जपले.
बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करणाऱ्या आगरकरीचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीतही त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या मांदियाळीत सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.गोपाळ गणेश आगरकर यांची जन्मभूमी असलेल्या कराड येथे होत असलेल्या पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे यांनी केले आहे.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular