
सातारा (विंदा करंदीकर नगरी) : सकाळचा थंडगार गारवा आणि कोवळ्या उन्हाला अंगावर घेत सुवर्णमहोत्सवाकडे हळूहळू वाटचाल करणार्या 19 व्या ग्रंथमहोत्सवाचे रणशिंग गांधी मैदानावर ग्रंथदिंडीने फुंकले . सरस्वती देवीची मूर्ती आणि भारतीय राज्यघटनेच्या पूजनाने अखंड चार दिवस चालणार्या शब्दसोहळ्याने सातारकरांना नवनवीन पुस्तकांच्या रस स्वादासाठी. आमंत्रण दिले . सातारा शहरातील सुमारे 75 शाळांनी ग्रंथदिंडीत. भाग घेतला होता. येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर कविवर्य विं . दा . करंदीकर नगरीत 19 व्या वर्षात पोहचलेल्या सातारा ग्रंथ महोत्सवाची शानदार सुरवात शुक्रवारपासून झाली . त्याची झलक गांधी मैदानावरून निघालेल्या ग्रंथदिंडीवरून पहायला मिळाली .सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडीचे भोई प्रथेप्रमाणे श्रीफळ वाढवण्यासाठी दाखल झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे , नगराध्यक्षा माधवी कदम , पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून दिंडी यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे शिरीष चिटणीस ,डॉ यशवंत पाटणे प्रदीप कांबळे ,विनायक लांडगे ,साहेबराव होळ उपस्थित होते.शालेय विद्यार्थ्याच्या ढोल ताशाच्या गजरात दिंडी राजपथावरून ग्रंथ नगरीकडे मार्गस्थ झाली . स्वच्छ भारत अभियान बेटी बचाव कचरामुक्त भारत ,वाचन संस्कृती दिन, आम्ही सावित्रीच्या लेकी, असे अनेक सामाजिक प्रश्न चित्ररथातून प्रकट झाले .अनंत इंगलीश स्कुलच्या लेझीमचा दणदणाट लक्षवेधी होता. चित्ररथांच्या माध्यमातून अवध्या महाराष्ट्राचे सामाजिक जीवन राजपथावर पहायला मिळाले . मोती चौक देवी चौक शाहू चौक पोवई नाका मार्गे ग्रंथदिंडी सकाळी दहा वाजता ग्रंथ नगरीत पोहोचली. विद्यार्थ्यांनी ग्रंथपालखीला अभिवादन केल्यानंतर दिंडीची सांगता झाली .